kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दौंड रेल्वेस्थानक पुणे विभागाला जोडण्यास अखेर रेल्वे मंत्रालयाची मान्यता ; खा. सुळे यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश


एक एप्रिल पासून अंमलबजावणी

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे हजारो प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या निर्णयासाठी सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहे.

अनेक वेळा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देत खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे या विषयाचा पाठपुरावा करत होत्या. प्रवाशांची संख्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूरपर्यंत जाणे कसे गैरसोयीचे होते, याबाबत वेळोवेळी त्यांनी नकाशासहित लक्षात आणून दिले होते. इतकेच नाही, तर प्रत्यक्ष लोकसभेतही त्यांनी अनेक वेळा हा विषय उपस्थित करून केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिले होते. दौंड येथून रोज पुण्यात येणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्थानक पुणे विभागाला जोडणे अत्यावश्यक असल्याचे सुळे त्यांनी सांगितले होते.

दौंडमधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. इतकेच नाही, तर शेतकरी आणि सर्वसामान्य दौंडकरसुद्धा बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यालाच प्राधान्य देतात. याशिवाय शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांचा रोज दौंड ते पुणे असा प्रवास सुरू असतो. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडल्यास त्यांच्या अडचणी आणि प्रश्न तातडीने सुटणे सोपे होणार आहे.

दौंड रेल्वे स्थानक पुणे शहर आणि पुणे विभागीय कार्यालयापासून जवळ आहे. याठिकाणी येणाऱ्या अडचणी किंवा काही अनुषंगिक कामे करण्यासाठी पुण्यातील अधिकाऱ्यांना वेळेत पोहोचणे शक्य होते. त्यामुळे हे स्थानक पुणे विभागाला जोडावे, अशी मागणी त्या सातत्याने सरकारकडे करत होत्या. या सततच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून दौंड स्थानक येत्या एक एप्रिल पासून पुणे विभागीय रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे.