kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी “राज्य क्रीडा दिन”-संजय बनसोडे

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच १५ जानेवारी हा दरवर्षी “राज्याचा क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली असून क्रीडा सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा २ लाख २५ हजार रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

भारताला पहिले वैयक्क्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव वाढवणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा, त्यातून राज्यातील विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी, याकरिता त्यांचा जन्मदिवस १५ जानेवारी रोजी राज्याचा ‘क्रीडा दिन’ म्हणून प्रतिवर्षी सर्वंत्र साजरा करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्हयास पुर्वी १० हजार अनुदान देण्यात येत होते. त्यात वाढ करुन प्रत्येक जिल्ह्यास राज्याच्या क्रीडा दिनासाठी ७५ हजार, राष्ट्रीय क्रीडा दिनास ५० हजार तर क्रिडा सप्ताहास १ लाख रुपये असे एकूण २ लाख २५ हजार रुपये सुधारीत अनुदान देण्याचा शुक्रवारी (दिनांक २९ डिसेंबर) शासन निर्णय काढण्यात आला आहे. ही क्रीडा प्रेमीसांठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मंत्री बनसोडे यांनी सांगितले.

तसेच पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा वितरण संमारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य क्रीडा दिवस साजरा करण्यात भरीव अनुदान उपलब्ध करुन दिल्याबद्दल संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत.

राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

क्रीडा व युवक सेवा संचनालय, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकुले, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालये, शासकीय तसेच खासगी विद्यापीठे, क्रीडा संस्था, मंडळे अकादमी, क्रीडा योजनांचा लाभ घेणाऱ्या संस्थांमध्ये साजरा केला जाणार आहे. यावेळी खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यान, क्रीडा रॅली, मॅरेथॉन, मार्गदर्शन शिबिर, खेळाडूंशी संवाद, क्रीडा पुरस्काराचे वितरण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा उपक्रमांचे आयोजन यामध्ये करण्यात येणार आहे. त्यास क्रीडा प्रेमींनी उत्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.