पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. यावरुन राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वैष्णवी हगवणे हिचे मृत्यू प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. ससून रुग्णालयात वैष्णवी हगवणे हिचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यानंतर हे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. यामध्ये वैष्णवीच्या मृत्यूचे कारण नमूद करण्यात आले आहे. तसेच वैष्णवीच्या शरीरावर ठळकपणे दिसतील अशा जखमा असल्याचे बाबही या डेथ सर्टिफिकेटमध्ये नमूद करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हे डेथ सर्टिफिकिट सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.
“जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये माहेरून आण म्हणून सुनेचा अत्याधिक छळ करून तिची हत्या /आत्महत्या इथपर्यंत मजल मारणाऱ्या मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार ? अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात.पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार?”असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
वैष्णवी हगवणे हिच्या काकांनीही या घटनेबाबत संशय बोलून दाखवला होता. आमच्या मुलीच्या अंगावर इतक्या खुणा आहेत. 16 मे रोजी सकाळी तिला टॉर्चर करुन मारण्यात आलं. त्यानंतर तिघीजणी घरातून बाहेर गेल्या. दुपारी 12 वाजता तिला पुन्हा एकदा अमानुषपणे मारण्यात आले. त्यानंतर वैष्णवीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलले, असे वैष्णवी हगवणेंच्या काकांनी म्हटले होते.
जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये माहेरून आण म्हणून सुनेचा अत्याधिक छळ करून तिची हत्या /आत्महत्या इथपर्यंत मजल मारणाऱ्या मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवलेला अटक कधी होणार ?
अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात.पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार? pic.twitter.com/bTRGQk3PgW
— SushmaTai Andhare (@andharesushama) May 21, 2025
वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचा विवाहसोहळा पुण्यातील सन्नीज वर्ल्ड येथे पार पडला होता. या लग्नसोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी वैष्णवीच्या वडिलांनी हुंडा म्हणून हगवणे कुटुंबीयांना 51 तोळे सोने, फॉर्च्युनर कार आणि साडेसात किलो वजनाची चांदीची पाच ताटं दिली होती. तसेच वैष्णवी ज्यावेळी घरी यायची, तेव्हा सासरच्या लोकांनी पैसे मागितल्याचे सांगायची. अशाप्रकारे दर दोन महिन्यांनी आम्ही वैष्णवीमार्फत हगवणे कुटुंबाला 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम द्यायचो. गणपतीत वैष्णवीच्या सासूने चांदीच्या गौरी मागितल्या होत्या. आम्ही त्यांना चांदीच्या गौरी दिल्या. अधिक महिन्यात जावयाला चांदीचे ताट आणि सोन्याची अंगठी दिली होती. दोन महिन्यांपूर्वी जावयाला दीड लाखांचा मोबाईल फोन घेऊन दिला होता, असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.