राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मला एकदातरी गृहमंत्रीपद द्या, असं कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार तासगावमध्ये म्हणाले. “वेडवाकडं चालूच देणार नाही. कारण वेडवाकडं खपतच नाही”, असंदेखील अजित पवार म्हणाले आहेत.
“आता बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालायला उतरलो. तिथून समोर तुमचं बस स्थानक बघितलं. आरारारा… अरे माझं बस स्थानक येऊन बघा काय बस स्थानक आहे आणि इथलं बघा. अरे नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असावी लागते. नुसतं भाषणं करुन तुमची पोटं भरणार नाहीत. भाषणं करुन इथल्या मुला-मुलींना रोजगाळ मिळणार नाही. अरे इतके वर्ष सर्वात जास्त गृहमंत्री कोण राहिलं आहे ते माहिती आहे? आर. आर. पाटील. मी कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो, मला एकदा गृहमंत्रालय द्या, बघतोच एकेकाला. बघतो म्हणजे चांगला कारभार करायला. वेडवाकडं चालू देणार नाही. मला वेडवाकडं खपतच नाही. माझा कार्यकर्ता चुकली तरी मी त्याला म्हणतो घे त्याला टायरमध्ये तिच्या मायला”, असं अजित पवार म्हणाले.
“आर. आर. आबा पण माझ्याबरोबर आमदार झाले. सगळ्या कंपनीचा पराभव केला. राष्ट्रवादीची स्थापना का झाली? परकीय व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होता कामा नये म्हणून परकीय व्यक्ती कोण सोनिया गांधी म्हणून वेगळ्या पक्ष काढला. ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या आणि निकाल लागला, आणि काँग्रेसच्या विलासराव देशमुख सरकारला आपण पाठिंबा दिला. चार महिन्यांआधी वेगळा पक्ष काढला आणि पुन्हा त्यांच्याच दावणीला जायचं”, असं अजित पवार म्हणाले.
“आर. आर. पाटील गेल्यानंतर स्मिताच्या लग्नाला मी तिथे उभा होतो ही आमची संस्कृती आहे. पण आज इथे तासगावमध्ये काय कामे झाली? हे चक्र आहे. आम्ही खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री सगळी पदे भोगली. आता पुढे नवीन पिढी देखील तयार केली पाहिजे. पुढच्या पिढीला देखील संधी दिली पाहिजे. या मतदारसंघातल्या सूतगिरणीची काय अवस्था आहे? शेजारच्या पलूस तालुक्यातील सूतगिरणीची बघा. कारण माणूस कर्तृत्ववान असावा लागतो. तासगावची काय अवस्था आहे ते बघा. भावनिक होऊन मते देऊन प्रश्न सुटत नाहीत”, असं अजित पवार म्हणाले.