म्यानमारमध्ये शुक्रवारी ७.७ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. म्यानमारमधील या भूकंपाचे तीव्र धक्के बँकॉक आणि भारतालाही जाणवले आहेत. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतातील दिल्ली आणि दिल्ली एनसीआरमध्ये या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. दिल्लीत या तीव्र धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
म्यानमारमधील ७.७ रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपामुळे किती नुकसान झाले यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितलं की, भूकंप १० किमी खोलपर्यंत होता. या भूकंपाचे केंद्रबिंदु हा मंडाले शहरापासून १७.२ किमी अंतरावर होते. म्यानमारमधील सागाइंग हे भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपामुळे म्यानमारमधील मंडाले येथील इरावती नदीवरील लोकप्रिय एवा ब्रिजही कोसळल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही, तर चीन आणि तैवानच्या काही भागांनाही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे बोलले जात आहे.
या भूकंपाची तीव्रता एवढी तीव्र होती की, थायलंड आणि मॅनमारमधील अनेक शहरांतील इमारती अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. बँकॉकमध्ये टॉवर्स कोसळले आहेत. तर डझनावर लोक बेपत्ता झाले आहेत.
या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे USGS चे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे, मेघालयातील गारो हिल्समध्येही ४.० एवढ्या तीव्रतेच्या भूकंपाचे झटके जाणवले. म्यानमारमधील मांडाले शहरात भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. येथे अनेक मंदिरे आणि बौद्ध ठिकानांचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान, मंडाले येथील भूकंपाच्या धक्क्यानंतर काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये काही इमारती हादरल्याचे दिसून येत आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरे बसल्यानंतर अनेक नागरिक घराबाहेर आल्याची माहिती सांगितली जात आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या दक्षिणी किनाऱ्याच्या सागाइंगच्या जवळ होता.
Leave a Reply