केरळचे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि काही मंत्र्यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने बुधवारी (27 मे) पहाटे छापेमारी केली. कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड (CMRL) मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयन यांच्या भाड्याच्या घरासह राज्यातील एकूण 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
आरोपानुसार, CMRL या खासगी कंपनीनं 2018 ते 2019 दरम्यान विजयन यांची मुलगी टी. वीणा यांच्या एक्सालॉजिक सोल्यूशन्स या आयटी कंपनीला सुमारे 1.72 कोटी रुपयांचे बेकायदेशीर पेमेंट केलं. मात्र, या बदल्यात संबंधित आयटी कंपनीनं कोणतीही सेवा पुरवली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारी केरळ उच्च न्यायालयानं CMRL ची याचिका फेटाळून लावली. या याचिकेत ईडीची कारवाई रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. ‘ईडी’नं 2024 मध्ये या आरोपांच्या चौकशीसाठी धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.
‘ईडी’नं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या भाड्याच्या घरासह राज्यभरातील 12 ठिकाणी अचानक छापेमारी केली. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही मोठी कारवाई विजयन यांची मुलगी वीणा विजयन यांच्या एक्सालॉजिक या आयटी कंपनीशी आणि कोचीतील कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड (CMRL) कंपनीशी संबंधित कथित मासिक पेमेंट प्रकरणाच्या तपासाचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे.
तिरुवनंतपुरम आणि कोचीसह ईडीने माजी मंत्री तसेच विजयन यांचे जावई मोहम्मद रियास यांच्या कोझिकोड येथील निवासस्थानीही छापेमारी केली. या कारवाईमुळे केरळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ईडीच्या छापेमारीदरम्यान वीणा विजयन आणि कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड (CMRL) चे व्यवस्थापकीय संचालक शशिधरन कार्था यांची चौकशी करण्यात आली. कोची येथील CMRL च्या कॉर्पोरेट कार्यालयात तसेच कार्था यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर तपास मोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तपास अधिकारी पोहोचले तेव्हा माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि त्यांची मुलगी वीणा विजयन तिरुवनंतपुरम येथील त्यांच्या घरी उपस्थित होते. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत डेटा आणि कागदपत्रे गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.












Leave a Reply