Breaking News

निवेदिता प्रतिष्ठान तर्फे ललना कला महोत्सव संपन्न

निवेदिता प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवा अंतर्गत भरलेल्या ,’ललना कला महोत्सव 2024′ ( वर्ष 11वे ) अंतर्गत, संगीत, साहित्य व चित्रकला अशा तीनही कला क्षेत्रांमध्ये अतिशय दिमाखदार असे ३ दिवस ३ वेगवेगळ्या सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामध्ये 27 मार्च रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह येथे मराठी भावगीतांचा ‘स्वप्नात रंगले मी’ हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रतिष्ठानच्या व्हॉइस ऑफ पुणे ग्रुपच्या २० गायिकांनी कार्यक्रम सादर केला, त्याचे संकल्पना व सूत्रसंचालन एडवोकेट अनुराधा भारती यांनी केले. व त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास अतिरिक्त आयुक्त सौ अनुपमा पवार उपस्थित होत्या.

त्याचप्रमाणे दि.‌२९ मार्च रोजी बालगंधर्व कलादालन येथे ‘आकृती’ या महिला चित्रकारांच्या २५ व्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकारव‌ तसेच संस्कार भारती या ललित कला क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व केंद्र शासनाच्या CCRT एक्स्पर्ट कमिटीवरचे सदस्य तसेच,महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांच्या हस्ते पार पडले. डॉक्टर प्रसाद वाळिंबे व डॉक्टर आरती शिराली यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

त्याचप्रमाणे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व मिसेस जोशी यांनीही चित्र प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली, प्रत्येक चित्राबद्दल समजून घेऊन स्वतःचे मत मांडले, व प्रत्येक चित्रकाराच्या कलेचे आणि संस्थेचे मनापासून कौतुक केले व,”आज जर मी या चित्रकला प्रदर्शनला उपस्थिती लावली नसती तर मी खूप मोठ्या उपक्रमाला मुकलो असतो याची खंत मला आयुष्यभर मनात राहिली असती ” असे कौतुकास्पद उद्गार काढले.

त्याचबरोबर पुणे फेस्टिवल चे उपाध्यक्ष श्री. कृष्ण कुमार गोयल यांनीही चित्रप्रदर्शनाला आवर्जून उपस्थिती लावली.