kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये ५०० कोटींचा घोटाळा ; संजय राऊतांचे गंभीर आरोप

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर यात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या नावानं असलेल्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाऊंडेशननं ५०० कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. राऊत यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. फडणवीस यांनी या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय चौकशी लावण्याची मागणी करावी, असं आव्हानही राऊत यांनी दिलं आहे.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये कागदोपत्री फक्त ४० ते ५० लाखांची उलाढाल आहे. मात्र या फाऊंडेशनच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवण्यात आलेत किंवा खर्च करण्यात आला आहे, ती रक्कम शेकडो कोटींमध्ये आहे. कॅशमध्ये करण्यात आलेल्या या खर्चासाठी पैसा नेमका कुठून आला?,’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची माहिती धर्मादाय आयुक्ताकडं मागितली आहे. मात्र, धर्मादाय आयुक्तांकडून ही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. धर्मादाय आयुक्तांवर प्रचंड दबाव असून ते राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

काय आहे संजय राऊत यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात ?

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या कार्याला आमचा आक्षेप नाही, मात्र या फाऊंडेशनचा संबंध थेट राज्याच्या मुख्यमत्र्यांशी असल्यानं त्याचे सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीनं होणं गरजेचं आहे. या फाऊंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. फाऊंडेशनचे आतापर्यंतचे सर्व हिशेब धर्मादाय आयुक्तांकडं दिले गेले आहेत का? याबाबत काहीही सांगितलं जात नाही. या फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे. त्या माध्यमातून बिल्डर व ठेकेदारांकडून रोख रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान ५०० कोटी या माध्यमातून जमा करण्यात आले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशन जी काही कामं करते, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागतो. हा निधी देणाऱ्या देणगीदारांची नावं प्रसिद्ध होणं गरजेचं आहे. हा सगळा निधी देणगीदार कोणत्या कारणासाठी देतात, हेही समोर आलं पाहिजे.

देशात अलीकडं चंदा दो, धंदा लो हे प्रकरण गाजत आहे. अनेक उद्योगपती व धनदांडग्यांनी काहीतरी मिळवण्यासाठी इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात ८ हजार कोटी जमा केले. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला मिळालेला पैसा हा याच पद्धतीचा दिसतो आणि त्यात प्रथमदर्शनी मनी लाँड्रिंगचा प्रकार दिसतो. त्यामुळं या घोटाळ्याची तात्काळ ईडी व सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.