आज पुण्यात महाविकास आघाडीची सभा पार पडली. बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नटसम्राट परवडतो, कार्यसम्राट परवडतो. पण धोके सम्राट, खोके सम्राट, पलटुसम्राट परवडत नाही, असा हल्लाबोल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, आता फक्त ट्रेलर दाखवतो. पिक्चर दाखवायला आपल्याकडं लय वेळ हाय. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेचे ठरलंय, बळकट हाताने स्वाभिमानाची मशाल पेटवायची अन् विजयाची तुतारी फुंकायची. मी पहिल्यांदा संसदेत गेलो तेव्हा मला सुपिया सुळे यांनी सांगितले होते की, जेव्हा जनतेच्या धोरणाविषयी चर्चा होईल, देशाच्या भवितव्याविषयी चर्चा होईल तेव्हा डोळ्यात तेल घालून जागा रहा. तेव्हा तुझा आवाज सर्व सामान्य लोकांसाठी गरजला पाहिजे, हे सुप्रिया सुळेंनी मला शिकवले.
आता पराभव समोर दिसू लागल्याने महायुतीकडून देशाच्या धोरणांविषयी बोलले जात नाही. वैयक्तिक टीका केली जाते. परवा कुणीतरी विचारले नटसम्राट पाहिजे की कार्यसम्राट पाहिजे. मी त्यांना सांगितले की, नटसम्राट परवडतो, कार्यसम्राट परवडतो. पण धोके सम्राट, खोके सम्राट, पलटुसम्राट परवडत नाही, अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर केली आहे.
इंदापूर येथे सभेत अजित पवारांनी तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’ असं वक्तव्य केलं. यावरून अमोल कोल्हे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. आता हे म्हणतायेत कचाकचा बटन दाबा, पाहिजे तेवढा निधी देतो. कर काय ह्यांच्या खिशातला आहे का? अहो आम्हा जनतेकडून तुम्ही कर घेता अन् त्या कराच्या जोरावर तुम्ही कचाकचा बटन दाबायला सांगता का? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.
कोट्यवधींना मोफत खाती उघडून दिली, नंतर त्या खात्यात दोन हजार रुपये रक्कम ठेवावीच लागेल असा नियम आणला. मग या खात्यांना आधार आणि पॅन कार्ड लिंक करायला लावलं. हे करण्यासाठी दोनशे रुपये फी आकारली, उशीर झाला तर दंड ही आकारला. मग हा निधी फोडाफोडी अन् निवडणुकीसाठी पैसा वापरला जातोय, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.