Breaking News

महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांच्याबद्दल ‘हे’ माहित आहे का ?

राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुकांचे वादळ दिसून येत आहे. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण आहे. अशातच महाराष्ट्रामधून मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीकडून आज व मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महायुतीमधील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. तर, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अखेर महायुतीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अखेर शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार असतील.

रवींद्र वायकर यांचा सामना महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याशी होणार आहे. अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांचे पुत्र आहेत. गजानन किर्तीकर हे शिवसेना शिंदे गटात आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी संजय निरुपम यांचं नाव महायुतीकडून चर्चेत होतं. महायुतीसोबत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रवींद्र वायकर आणि संजय निरुपम या दोघांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला होता. तर दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अरविंद सावंत यांच्याकडून प्रचारालादेखील सुरुवात झाली आहे. तर महायुतीत दक्षिण मुंबईचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. भाजप आणि शिवसेना यांच्यात या मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरु होती. अखेर या मतदारसंघाचा तिढा आज सुटला आहे. यामिनी जाधव यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. पण भाजप नेत्यांची नावे देखील चर्चेत होती. त्यामुळे तिढा वाढताना दिसत होता. अखेर हा तिढा आज सुटला आहे.

यामिनी जाधव कोण आहेत?

यामिनी जाधव या मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यामिनी जाधव यांची नुकतीच भेट झाली होती. यामिनी जाधव यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यामिनी जाधव यांची भेट झाली होती. या भेटीत तब्बल दीड तास चर्चा झाली होती. या चर्चेतच यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. त्यानंतर आज अधिकृतरित्या प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती जारी करण्यात आली आहे.

शिवसैनिक ते आमदार असा यामिनी जाधव य़ांचा प्रवास राहिला आहे. यामिनी जाधव या उच्च शिक्षित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या शिवसेनेत सक्रिय आहेत. 2012 मध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2019मध्ये त्यांना शिवसेनेने भायखळ्यातून तिकीट दिलं. यावेळी त्या एमआयएमच्या वारिस पठाण यांना पराभूत करून विजयी झाल्या. विशेष म्हणजे पठाण हे स्थानिक आमदार होते. तर यामिनी जाधव या पहिल्यांदाच विधानसभेला उभ्या होत्या. तसेच हा संपूर्ण परिसर मुस्लिम बहुल असतानाही त्या विजयी झाल्या होत्या. त्यांनी महापालिकेत नगरसेविका म्हणून विविध समित्यांवर चांगलं काम केलं होतं.

रवींद्र वायकर कोण आहेत?

रवींद्र दत्ताराम वायकर हे 65 वर्षाचे आहेत. साधा शिवसैनिक ते गृह निर्माण राज्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम पाहिलं आहे. 1992मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत. या काळात ते सलग तीन वेळा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते.

2014 मध्ये युतीचं सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र वायकर यांची गृहराज्य मंत्रीपदी वर्णी लागली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार आल्यानंतर वायकर यांना मुख्यमंत्री कार्यालयात चीफ कोऑर्डिनेटर बनवलं होतं. पण त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली नव्हती.

मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक राहिलेल्या वायकर यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशासनाकडून काम करून घेण्याची त्यांची हातोटी आहे. महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती.