महाराष्ट्राच्या सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक असणारा सण म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी राज्यभरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. या दिवशी लाखो भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. हा सण पुढच्या महिन्यात 17 जुलैला असणार आहे. विशेष म्हणजे आता भाविकांची पावलं पंढरपुराच्या दिशेला वळू लागली आहेत. असं असताना पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या मंदिरात सुरक्षा व्यवस्थेबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रूटी समोर आल्या आहेत. इथे सुरक्षा व्यवस्थेसाठीची साधणं धुळखात पडल्याचं पहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे देशातील अनेक महत्त्वपूर्ण मंदिरं दहशतवाद्यांचे टार्गेट राहिलेली आहेत. त्यामुळेच पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासाठी दरवर्षी शासन आणि मंदिर समिती लाखो रुपये खर्च करत असताना सुद्धा या मंदिराची सुरक्षा व्यवस्था विठ्ठल भरोसे आहे, असंच म्हणावं लागेल.

विठ्ठल मंदिराच्या बाहेर दुचाकी गाड्या लावण्यात आल्या आहेत. मंदिराच्या अतिशय जवळ या गाड्या लावण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात चारचाकी गाड्यादेखील सोडल्या जात आहेत. मंदिराच्या व्हीआयपी गेटवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत नाही. वास्तविक पाहता या गेटने आमदार, खासदार, मंत्री यांना सोडलं जातं. मात्र या गेटला कोणतीही सुरक्षेची यंत्रणा बघायला मिळत नाही.

विशेष म्हणजे या गेटने जाणारे-येणारे कर्मचारी किंवा पुजारी असतील, किंवा जे स्वत:ला व्हीआयपी समजतात, अशाही लोकांना या गेटने विनातपासणी सोडलं जातं. त्यामुळे श्रीविठ्ठलाचं मंदिर हे विठ्ठलाच्याच भरोसे असल्याचं बघायला मिळत आहे.