kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रातील DJ बंद करा ; अखिल महाराष्ट्र सांस्कृतिक कलाकार संघटना आणि आर्यभूषण थिएटरच्या वतीने मागणी

लोककला तमाशा हा १७ व्या शतकापासून लोकप्रिय असणारा लोककला प्रकार आहे. या लोकप्रिय कला प्रकारचे पारंपारिक रूप कसे आहे. मात्र, आधुनिक काळात त्याचे स्वरूप बदलले  आहे.  तमाशा हा रंजनप्रकार सिद्ध होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये गोंधळ, वाघ्या – मुरळी, भेदिक लावणी व ढोलकी, तबला वादक तसेच गायन काम असे विविध धार्मिक अधिष्ठान असलेली विधीनाट्य होती. आज तीच कला काही आगळ्या वेगळ्या माणसांच्या विचाराने मोडीत काढण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये लोककला जोपासली जात असताना महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रा मध्ये डीजे हा प्रकार वादकांना बंदी घालून देखील  चालूच आहे. तरी हा डीजे चा प्रकार लवकरात लवकर बंद करावा. तसेच ज्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्या कलाकाराला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र सांस्कृतिक कलाकार संघटना आणि आर्यभूषण थिएटर च्या वतीने करण्यात आली आहे.  

 यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सांस्कृतिक प्रकोष्ट भाजपा प्रिया बेर्डे, जेष्ठ लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, मानधन कमिटी अध्यक्ष शशिकांत कोठावळे, राजूशेठ तांबे, लावणी सम्राज्ञी संगीता लाखे, उपाध्यक्ष सांस्कृतिक विभाग भाजपा राहिल तांबे, राष्ट्रवादीचे सांस्कृतिक समन्वयक अनिल गुंजाळ, रेश्मा परितेकर, ढोलकी वादक शिवाजीराव जावळेकर, मंगेश भालेराव, धोंडिराम जावळेकर,जतिन पांडे आणि सर्व लावणी कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते.

मेघराज राजेभोसले म्हणाले, आम्ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील थिएटर मालक, तमाशा पार्टी मालक व वादक कलावंत यांची एकत्रीत एक बैठक बोलवणार आहोत. यामध्ये DJ हटवण्या  संदर्भात सामंजस्याने तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच या बैठकीत तोडगा न निघाल्यास आम्ही शासनाकडे यासंदर्भात दाद मागणार असून थिएटर मालक, तमाशा पार्टी मालक यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहोत.

लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. त्याचे सौंदर्य पारंपारिक नऊवारी साडी आणि प्रत्यक्ष सादरीकरणात आहे. मात्र आज त्याचे बदलत जाणारे स्वरूप पाहता महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय अशी, भीती वाटते. तसेच लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रात अश्लील प्रकार देखील घडतील अशी परिस्थिती आहे. तेव्हा सांस्कृतिक कला केंद्राचा डान्सबार होवू नये, अशी आमची अपेक्षा आहे, असेही मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.       

कला केंद्रातील कलाकारांच्या मागण्या –
१) लोकनाट्य कला केंद्र मध्ये / सुरु असलेला / डीजे / तत्काळ बंद करण्यात यावा.

२) लोकनाट्य कला केंद्रामध्ये / असलेल्या (महिला कलावंत व पुरुष कलावंत) यांचे आरोग्य विमा काढण्यात यावे.

३) लोकनाट्य कला केंद्र मध्ये असलेल्या कलाकाराचे आयुष्य कलेच्या माध्यमातून काम केल्याने (महाराष्ट्र शासन) कलाकार मानधन चालू करण्यात यावे.

४) लोकनाट्य कला केंद्र मध्ये असलेल्या कलाकाराला (पुरस्काराने सन्मानित) करण्यात यावे.

५) लोकनाट्य कला केंद्र मध्ये असलेले कलाकारावर कुठलाही प्रकारे (अन्याय अथवा अत्याचार) होणार नाही याची दाखल घेण्यात यावी.