राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोमच्या धर्तीवर साकारलेल्या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान आणि शाहुकालीन पॅलेस थिएटर म्हणून ओळखलं जाणारं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी, ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी भीषण आग लागली. ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करावं लागले. या आगीचं नेमकं कारण कळलं नसलं, तरी शॉर्टसर्किटनं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळं परिसरात आगीचे प्रचंड लोळ दिसून येत होते. कुस्ती मैदानाचं व्यासपीठ आणि थिएटर या आगीत भक्षस्थानी पडल्यानं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती देण्यात आली.
कलानगरी कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा असलेला अन् कोल्हापूरचा मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झालं आहे. त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूरचा आत्माच या घटनेने होरपळला गेला. करवीरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेलं केशवराव भोसले नाट्यगृह आणि ऐतिहासिक खासबाग मैदानाचे व्यासपीठ शाॅर्ट सर्किटने लागलेल्या आगीत खाक झाले. त्यामुळे कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या मानबिंदूची राख होऊन गेली आहे. आग इतकी भीषण होती की क्षणार्धात नाट्यगृहाची बाल्कनी सुद्धा क्षणात कोसळून गेली. नाट्यगृहातील व्यासपीठ, खूर्च्या, विद्युत यंत्रणा जळून खाक झाली. सागवान आणि फर्निचर मोठ्या प्रमाणात असल्याने पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी होती की तब्बल अडीच तास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. कोल्हापूर विमानतळावरील अत्याधुनिक गाड्याही पाचारण करण्यात आल्या. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजत आहे.
त्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यासाठी अत्यंत शर्तीचे प्रयत्न करावे लागले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांची आज (9 ऑगस्ट) जयंती असल्याने केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणामध्ये मंडप घालण्यात आला होता. या मंडपामुळे सुद्धा आग विझवण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला. दरम्यान, आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर मंडप खोलून तातडीने बाजूला करण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणामध्ये दाखल झाल्या. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त ९ ते १० ऑगस्ट या कालावधित राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जीवन कार्यावर आधारित या नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे यांनी दिली. तत्पूर्वीच या नाट्यगृहालाही आग लागल्यानं कोल्हापूरकर आणि रसिक प्रेक्षकांकडून हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे.