अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यासाठी मंदिर प्रशासन आतापासून नियोजनाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. श्री राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी देशभरातून रामचरण पादुका यात्रा काढण्यात येणार आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. या पादूका यात्रेचे स्वरूप कसे असणार आहे आणि त्यासाठी किती खर्च येणार आहे याबद्दलची माहिती समोर आली आहे.
उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत रामचरण पादुका यात्रा काढण्यात येणार आहे. राम वनगमन मार्गाने म्हणजेच वनवासाच्या काळात प्रभू रामाने ज्या ज्या ठिकाणाहून प्रवास केला त्या ठिकाणाहून ही यात्रा देशभरात फिरणार आहे. यात्रेदरम्यान, राम वनगमन मार्गाच्या शृंगवेरपूर, चित्रकूट इत्यादी विविध थांब्यावर भजन, कीर्तन आणि रामायण पठणाचे कार्यक्रम होतील. भगवान श्रीरामाच्या आदर्शांची झलक सांस्कृतिक तक्त्यांमधून पाहायला मिळणार आहे.
राज्यातील 826 नगरपालिकांमध्ये विविध संकीर्तन मंडळांकडून दररोज संकीर्तन केले जाईल. या कार्यक्रमात राज्यातील रामायण परंपरेशी निगडीत मंदिरे, ठिकाणे आणि हनुमान मंदिरात मकर संक्रांतीपासून राम मंदिराच्या उद्घाटनापर्यंत अखंडपणे भजन, सुंदरकांड आणि अखंड रामायणाचे पठण केले जाणार आहे. यासाठी राज्य सरकार 50 कोटी रुपये खर्च करणार आहे.
मंदिराचा उद्घाटन सोहळा भव्यदिव्य करण्यासोबतच अनेक जागतिक विक्रमांचीही नोंद होणार आहे. सोहळ्यापूर्वी सामूहिक शंख वाजविला जाईल. यामध्ये 1111 शंख फुंकून विश्वविक्रम करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी नॉर्थ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर (NCZCC) आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (IGNCA) यांची मदत घेतली जाईल. शौर्य गाथा कार्यक्रमांतर्गत मुली व महिलांसाठी तलवार रास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये 2500 महिला सहभागी होऊन विश्वविक्रम करणार आहेत. रामकथा पार्क अयोध्येत हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.