kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

तब्ब्ल १८ वर्षे आणि …. विराटचे भरुन आलेले डोळे !!!

आरसीबी.. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु… आयपीएल मधील एक लोकप्रिय टीम… विराट कोहली आणि आरसीबी हे समीकरण पहिल्यापासून चाहत्यांना भुरळ घालत आहे. गेली १८ वर्षे एका गोष्टीची इच्छा मनात बाळगली होती… या सगळ्यांचे एकच स्वप्न … एकच इच्छा … जी पूर्ण व्हायला लागली तब्ब्ल १८ वर्षे आणि …. अखेर ३ जून २०२५ रोजी तो दिवस उजाडला ! खरतर, आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंह जेव्हा शेवटच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर बाऊंड्री मारु शकला नाही; तेव्हाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजय जवळपास निश्चित झालेला होता.

विराटचे भरुन आलेले डोळेच बरंच काही सांगत होते. आजवर अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण झाल्याची कहाणी त्याचे ते पाणावलेले डोळेच सांगू पाहत होते. त्यानंतर, पडलेल्या प्रत्येक बॉलसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजय पक्का होत गेला आणि विराट कोहलीची भावनिकता टिपेला पोहोचत गेली. सरतेशेवटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सला सहा धावांनी मात दिली आणि विराट कोहलीच्या आनंदाला पारावार उरला नाही.

या विजयाने भावूक झालेल्या विराटने म्हटलं की, त्याने असा कधीच विचार केला नव्हता की त्याला हा दिवस देखील कधी पहायला मिळू शकेल.

विराट कोहलीवर आरसीबीने तेव्हा बोली लावली होती, जेव्हा त्याने टीम इंडियासाठी डेब्यूदेखील केलेला नव्हता.

आता पहिल्यांदाच आरसीबी चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहलीने म्हटलं की, “हा विजय जितका त्याच्या संघाचा आहे, तितकाच तो त्याच्या संघाच्या चाहत्यांचाही आहे. १८ वर्षांची भलीमोठी प्रतीक्षा करावी लागली. मी माझे तारुण्य, माझं कौशल्य, माझा अनुभव दिला. मी माझं सगळं काही दिलं. मी असा कधीच विचार केला नव्हता की कधी हा दिवसही येईल. जेव्हा शेवटचा बॉल टाकण्यात आला, तत्क्षणी मी भावूक झालो.”

“काहीही झालं तरी मी या टीमला जोडूनच राहिलो. असेही काही क्षण आले होते, जेव्हा मी वेगळा विचार केला; मात्र, तरीही मी या टीमशी संलग्न राहिलो. माझं हृदय बंगळुरुसोबत आहे, माझी आत्मा बंगळुरु आणि या टीमसोबत आहे. आणि मी जोपर्यंत आयपीएल खेळेन, तोपर्यंत याच टीमसोबत राहीन.”

विराट कोहलीने म्हटलं की, हा विजय त्याच्या करिअरमधल्या सर्वश्रेष्ठ क्षणांपैकी एक आहे.

“आज मी एका लहान मुलाप्रमाणे रडतो आहे. अनेक लोकांनी ऑक्शननंतर आमच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, जे आमच्याकडे होतं, त्यावर आम्ही खुश होतो. माझ्याबद्दल याआधीच बरंच काही बोलण्यात आलंय. हा विजय बंगळुरुसाठी आहे,” असंही त्याने म्हटलं.

विराट कोहली त्यावेळी पहिल्यांदा चर्चेत आला होता जेव्हा २००८ मध्ये त्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी ठरली होती. मात्र, विराट कोहलीकडे इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याचा अद्याप अनुभव आलेला नव्हता. त्यामुळे, आरसीबीने त्याला पहिल्या सीझनमध्ये २० लाख रुपयांना खरेदी केलं होतं.

२०११ साली विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं. तेव्हा विराट कोहलीने आपल्या बॅटची जादू दाखवत १६ सामन्यांमध्ये ५५७ धावा केल्या आणि आरसीबी दुसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली. मात्र, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने आरसीबीला ही ट्रॉफी जिंकण्यापासून रोखलं.

इतक्या वर्षांच्या निराशेनंतर २०१६ मध्ये विराट कोहली एक वेगळीच जिद्द घेऊन मैदानात उतरला. विराट कोहलीने एकाच सीझनमध्ये भलेभले रेकॉर्ड्स रचले. त्या सीझनमध्ये विराट कोहलीने १६ सामन्यांमध्ये विक्रमी ९७३ धावा केल्या. त्याने चार शतकं आणि सात अर्धशतकं साकार केली. त्यानंतर आरसीबी तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचली. मात्र, फक्त ८ धावांच्या अंतराने सनरायझर्स हैद्राबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला फायनल्समध्ये मात दिली आणि विराट कोहलीचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरंच राहिलं.