आजकाल मुलांना प्रत्येक स्तरातून,माध्यमातून व्याख्यान,समुपदेशन ,माहितीपट दाखविले जातात ,जेणेकरून मुलांना आपल्या भोवतीच्या जगात काय चाललय ,कसे वागले पाहिजे ,काय केले पाहिजे हे कळावे.असेच असेच व्याख्यान माझा मुलगा ऐकून आला आणि म्हणाला हे व्याख्यान माझ्यासाठी नव्हतं कारण त्यामध्ये जे सांगितलं त्याप्रमाणे माझे बाबा कुठे दिवसभर कष्ट करतात आई कुठे कष्ट करते,आणि तो हसायला लागला .मी सांगितले अरे आम्ही तुला दुःखाची झळ पोहचू नये म्हणून जे काम करतो त्यामुळे तुला माहितीच नाहीये आईबाबा आपल्यासाठी काय करतात? त्याला मी सांगायला लागले प्रत्येकवेळी शारीरिक कष्ट म्हणजे कष्ट नसतात रे ,आजचकाल वाढती महागाई मुलांसाठी शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा पाहता, अनेक शैक्षणिक गोष्टी कलात्मक गोष्टी आपला पाल्य त्याची आवड बघून त्याचा कल बघून त्याला अनेक शिकवण्या अनेक साहित्य उपलब्ध व्हावे ह्यासाठी पालकांची ओढाताण ,काही पालक महिन्याला लाखो रु पगार आणत असतील तर दिवसभर ते आपल्या लेकरांचे तोंड ही पाहत नाहीत ,हे करताना आपले लेकरू कसे मोठे होतय त्याच्या बाललीला ही पालकांना पाहता येत नाहीत.ना वृद्ध आईवडिलांशी संवाद ना सेवा ,काही मध्यमवर्गीय कुटुंबात ऋण काढावे लागते ,मग ते कर्ज घरासाठी,वाहनांसाठी,शैक्षणिक गोष्टींसाठी घेतले जाते,ते फेडण्यासाठी जास्तीचे काम करणे त्यासाठी शारीरिक मानसिक त्रास असतोच ना?ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनात मग मानसिक त्रास त्यातून शरीरावर होणारे परिणाम आणि त्यातून मग अनेक व्याधी मागे लागतात ,बी पी,हृदयविकार,मधुमेह ह्या आजारांनी ताणाचे परिणाम म्हणून तरुण वयात अकाली मृत्यू होतात . त्यांनतर स्त्रीला येणारे अकाली वैधव्य मुलांना अनाथांची भावना कारण आई किंवा वडील नसणे हे मुलांसाठी खूप वेदनादायक असते .


पुढे विषय आला आईच्या माहेरपणाचा ,आजकाल 2 च अपत्य किंवा एकच अपत्य त्यामुळे मुलीला माहेरचे ही पहावे लागते ,त्यातून गावातच माहेर असेल तर 2 दिवस निवांतपणा किंवा मुलांसाठी मामाच्या गावाचे सुख नाही मिळत कारण तिथल्या तिथे राहत असल्याने नकळत जास्त सासरच्या घराकडेच बाईचे मन ओढ घेते,त्यामुळे मुलांना आईसाठी माहेर त्याचे सुख ,महत्वाचे वाटत नाही आणि एकाच गावात असेल तर सगळे भांडणकुरघोडी ह्या चव्हाट्यावर येणार नाही ह्याची ही काळजी घ्यावी लागते.
सासर माहेर सांभाळताना कामाचे व्याप ,कामात सतत सहवासाने एकत्र येणारी माणसे ,त्यातून निर्माण होणारे प्रेमसंबंध मग हे संबंध विवाहित नात्यात असतील तर विवाहबाह्य संबंध हे अतिशय क्लेशदायक असतात ,काही दुर्लक्षित करतात ,काही घटस्फोट घेतात ,पण ह्यातून पालकांविषयी असणाऱ्या आदरात कुठे तरी रितेपण येते


कष्ट करणारा गरीब मजूर घरी येऊन स्वतःच्या कुटुंबासोबत एकत्र शिळी भाकरी भाजी खाऊन ही सुखी असतो.
सगळ्या सुखसोयी ,बंगला, गाडी,पैसा असताना काही क्षण ही कुटुंबासोबत घालवू शकत नसेल तर त्या सुखाला काय अर्थ आहे?
मुलाला सांगितले ,माझे वडील मुंबईला कामाला होते ,महिन्याने किंवा दोन महिन्याने फक्त 2 त3 दिवस यायचे आम्हाला भेटायला ,कित्ती आनंद असायचा ,पण ते जाताना त्यांच्या गळ्यात पडून रडणे,निकाल किंवा कोणत्या ही स्पर्धेतील बक्षीस मिळाले की ते पत्राने कळवायचे ,आणि आता सगळे एकाच घरात राहूनही संवाद नाही नजरानजर नाही ,मग मनात विचार येतो कोणासाठी हे घरकुल असते तिथे पिल्लाना माहितीच नसते आपल्या आईबाबा काय कष्ट करतात ,प्रत्येक कष्ट हे शारीरिक नसतात तर काही कष्ट बौद्धिक, मानसिक ज्यातून ,अनेक सुखदुःखाचे प्रसंग सुटून जातात ,अनेक नात्यांचे भेटणे राहून जाते अनेक प्रवास राहून जातात अनेक भेटीगाठी राहून जातात,अनेक किस्से संवाद राहून जातात,अनेक गुजगोष्टी राहून जातात,अनेक आवडीनिवडी ज्या कला जोपासण्यासाठी ठरवलेल्या असतात त्या सुटून जातात,अनेक साहित्य वाचायचे राहून जाते,अनेक चवी घ्यायच्या राहून जातात आणि मग आयुष्याच्या संध्याकाळी आठवणीच नसतात कारण आठवणी साठी तसे काही घडलेले नसते मग कोणासाठी काय कष्ट केले हे पाहताना हीच मुले म्हणतील तुम्ही आमच्यासाठी काय केले?

पल्लवी फडणीस,भोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *