शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच एन रिलायन्स रुग्णालयातअँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचे समोर येत आहे . उद्धव यांची आज सकाळी आठ वाजल्यापासून एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची तपासणी डॉक्टरांकडून केली जात होती. या तपासणी दरम्यान ब्लॉकेज आढळून आल्यानंतर अँजिओग्राफीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओप्लास्टी झाल्याचं सांगण्यात आले. उद्धव ठाकरे आज चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. यापूर्वी, उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये काँग्रेस वार्तांकन करणारे पत्रकार आदेश रावल यांनी लोकमत हिंदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदावर निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी केल्या होत्या. तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेतली होती. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाल्याचा दावा आदेश रावल यांनी केला आहे.