kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

3000 कोटींच्या निविदा गैरव्यवहारप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जोरदार मागणी

ठाणे-घोडबंदर-भाईंदर उन्नत मार्गाच्या निविदेत 3000 कोटी रुपयांची संशयास्पद तफावत उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाने संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना तातडीचे पत्र पाठवले आहे.

मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (नगरविकास व सार्वजनिक बांधकाम), तसेच MMRDA आयुक्त यांना ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आलेल्या मूळ निविदेच्या तुलनेत नव्याने जाहीर झालेल्या निविदेत तब्बल 3000 कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर, शंका उत्पन्न करणारी व संभाव्य भ्रष्टाचाराची संकेत देणारी आहे.

3000 कोटी रुपयांची तफावत ही फक्त नियोजनातील त्रुटी नसून, पूर्वीच्या निविदेत दरवाढ करून शासनाची फसवणूक झाली असण्याचा प्रबळ संशय आहे.निविदा प्रक्रियेत सहभागी अधिकारी, सल्लागार व ठेकेदार यांच्यात संगनमत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा प्रकरणांमध्ये केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई न करता वरिष्ठ निर्णयप्रक्रियेत सहभागी व्यक्तींवरही जबाबदारी निश्चित केली पाहिजे.सार्वजनिक निधीचा वापर पारदर्शक व जनतेच्या हितासाठी होणे अत्यावश्यक आहे.

मागण्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.संपूर्ण निविदा प्रक्रियेतील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी. शासनास झालेल्या संभाव्य आर्थिक नुकसानीसाठी IPC व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.प्रकरण ACB, CBI किंवा तत्सम स्वतंत्र चौकशी यंत्रणेकडे सुपूर्द करून चौकशी पारदर्शक पद्धतीने पार पाडावी.चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून तात्काळ निलंबित करण्यात यावे.

ॲड. अमोल मातेले यांनी स्पष्ट केले की, “हे प्रकरण केवळ आर्थिक अपव्ययाचे नाही, तर लोकशाही व्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाशीही निगडित आहे. त्यामुळे याची तातडीने गंभीर दखल घेऊन कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.”