kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सलमान खान याला वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या सलीम खान यांना बिश्नोई महासभेचा करारा जबाब

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची बिश्नोई गँगने हत्या केल्यानंतर सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खान याला विविध मार्गाने धमक्या मिळत आहेत. तर पोलिस तपासात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तर सलमान खान याच्या बचावात त्याचे वडील सलीम खान हे उभे ठाकले आहे. सलमान खान याने काळवीटाची शिकार केली नसल्याचा दावा काल प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. त्यावर बिश्नोई महासंघाने खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. महासंघाने या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी उपाय पण सुचवला आहे.

सलमान खान याचे वडील आणि पटकथा लेखक सलीम खान यांनी त्याची पाठराखण केली आहे. काल प्रसार माध्यमांशी बोलताना त्याने झुरळ सुद्धा मारलं नाही. काळवीट तर दूरचा विषय राहिला, असा सूर आळवला होता. सलमान खान याच्याविरोधात सध्या बिश्नोई गँगचे धमकीसत्र सुरू आहे. त्याने माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार माफीसाठी नाही तर खंडणी सुरू आहे, असा गंभीर आरोप सलीम खान यांनी केला आहे. त्यावर आता बिश्नोई महासंघाची खरमरीत प्रतिक्रिया आली आहे. सलमान खान आणि त्याचे कुटुंबिय एक नंबरचे खोटारडे असल्याचा आरोप बिश्नोई महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुढिया यांनी केला आहे. हा या कुटुंबाचा दुसरा गुन्हा असल्याचे ते म्हणाले.

बिश्नोई महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुढिया यांनी सलमान खान याने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागण्याचा सल्ला दिला. याठिकाणी सलमान खानने देवाची आणि समाजाची माफी मागावी असा तोडगा त्यांनी सुचवला. यापूर्वी एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत, सलीम खान यांनी सलमान खान याने साधं झुरळ सुद्धा मारलं नाही. त्यानं काळवीटाची शिकार केली नाही. त्याच्याकडे कोणतेही बंदुक आढळली नसल्याचा दावा केला होता.

पोलीस, वन विभाग, स्थानिक प्रत्यक्षदर्शी आणि न्यायपालिका खोटे आहेत असे सलीम खान यांना म्हणायचे आहे का? असा उलट सवाल बिश्नोई महासंघाच्या अध्यक्षांनी केला. पोलिसांना काळवीटाचे अवशेष मिळाले. त्याची बंदुक मिळाली. सलमान खान याला तुरुंगवासात जावे लागले आहे. साक्षी-पुराव्या आधारे न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणात सलमानला दोषी ठरवल्याचे ते म्हणाले. हा सर्व प्रकार माफी मागण्यासाठी नाही तर खंडणी उकळण्यासाठी सुरू असल्याचा गंभीर आरोप सलीम खान यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणात कोणतीही माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.