पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील फरार आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सी हा कर्करोगानं ग्रस्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मेहुल चोक्सीवर बेल्जियममध्ये उपचार सुरु आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात चोक्सीच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 400 कोटींना गंडा घालता होता. त्यानंतर मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी हे आपल्या कुटुंबासहसह देशातून पसार झाले होते. यानंतर तपास यंत्रणेनं 2018 च्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल होतं. या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास चोक्सीची जप्त केलेल्या सर्व संपत्तीवर टांच आणण्याची प्रक्रिया तपास यंत्रणेनं सुरू केली आहे. यामुळे त्याची आर्थिक नाकाबंदी करणं शक्य होणार आहे.
मेहुल चोक्सी प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देऊन तूर्तास भारतात परतण्यास असमर्थ असल्याचं आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, मेहुल चोक्सी हे आजारी असून ते आरोग्यविषयी समस्यांबद्दल वस्तुस्थिती नोंदवण्यासाठी अर्ज दाखल करु इच्छितात. मेहुल चोक्सी हे सध्या उपचारासाठी बेल्जियममध्ये आहे. मेहुल चोक्सीला कर्करोग झाल्याची भीती आहे. यामुळे मेहुल चोकसीने भारत परत येण्यास असमर्थ असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, मेहुल चोक्सीचा पासपोर्ट भारताकडून रद्द करण्यात आला आहे. पीएमएलए न्यायालयात चोक्सीच्या पासपोर्टच्या निलंबनासंदर्भातील कागदपत्रे आणि त्याच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) प्रकरणाच्या तपास फायली मागवण्याचे निर्देशही यापूर्वी देण्यात आले होते. तसेच मेहुल चोक्सीशी संबंधित 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी पीएमएलए कोर्टानं दिली होती. त्यानुसार सध्या कारवाई केली जात आहे.