सोन्याचा भाव कडाडल्यामुळे सोन्याची झळाळी वाढली असतानाच सर्वसामान्य नागरिक, गुंतवणूकदारांना अनेक प्रश्न पडत आहेत. सोन्याच्या भावातील तेजीसंदर्भात त्यांच्या मनात अनेक शंका आहेत. सोन्याच्या भावाशी निगडित विविध मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा भार स्वीकारल्यापासून निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. यात एक महत्त्वाचा निर्णय इतर देशांमधून येणाऱ्या मालावर आयात शुल्क आकारण्याचा देखील आहे. त्यांच्या या निर्णयाचा जगभरात परिणाम झाला आहे. एकीकडे भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला सोन्यात मोठी तेजी येत सोन्याचे भाव वाढले आहेत. सोन्यामधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. सोन्याच्या भावात होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, गुंतवणूकदार आणि उद्योगात चिंतेचं वातावरण आहे.
गेल्या 5-6 दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्यानं वाढ होते आहे. मंगळवारी (11 फेब्रुवारी) चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 8,060 प्रति ग्रॅम इतका होता. तर सोव्हेरन गोल्डचा भाव 64,480 (8 ग्रॅम) रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
लंडन बुलियन मार्केट हे जगातील सर्वात आघाडीचे ट्रेडिंग व्यासपीठ आहे. तिथेच सोन्याचा भाव किंवा किंमत निश्चित होते. बडे खाणउद्योजक आणि मोठे उद्योजक या व्यवस्थेचा भाग आहेत. या बाजारात सोन्याच्या भावात सातत्यानं वाढ होते आहे. यामागे विविध कारणं आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली राजकीय परिस्थिती, आयात शुल्क आणि जगभरात विविध ठिकाणी असलेली युद्धजन्य स्थिती यामुळे सोन्याच्या भावात वाढ होताना दिसते आहे.
ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अमेरिकेनं चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ केली. त्याला प्रत्युत्तर देत चीननं देखील अमेरिकेतून चीनमध्ये आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क लागू केलं. परिणामी, दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध वाढण्याच्या शक्यतेची चेतावणी तज्ज्ञ देत आहेत.