पाकिस्तानमध्ये एका प्रवासी रेल्वेवर दहशतवादी हल्ला झाला असून, हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात रेल्वे चालक जखमी झाला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जाफर एक्सप्रेस नावाची ही रेल्वे बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तुनख्वा येथील पेशावर येथे जात होती. याच्या नऊ डब्यांमध्ये सुमारे ४०० प्रवाशी होते. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
बलूच लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी संघटनेने एका निवेदनात या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह रेल्वेतील प्रवाशांना ओलीस ठेवले असल्याचे म्हटले आहे. पण, हल्लेखोरांनी प्रवाशांना ओलीस ठेवल्याच्या दावाची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, बलूच लिबरेशन आर्मीने दावा केला आहे की, या हल्ल्यात सहा लष्करी कर्मचारी मारले गेले आहेत. बलूच लिबरेशन आर्मीने असेही म्हटले आहे की, त्यांनी १०० हून अधिक प्रवाशांना ताब्यात घेतले आहे. याचबरोबर, जर पाकिस्तानने ओलीस ठेवण्यात आलेल्या प्रवाशांच्या सुटकेचा प्रयत्न केल्यास सर्वांची हत्या करण्याची धमकीही दिली आहे.
बलूच लिबेरेशन आर्मीच्या निवेदनानुसार, त्यांनी १०० हून अधिक प्रवाशांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे कर्मचारी आहेत. “ओलीस ठेवलेल्या प्रवाशांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवादविरोधी दल आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) चे कर्मचारी आहेत. हे सर्वजण रजेवर असून सुटीसाठी ते पंजाबला निघाले होते,” बलूच लिबेरेशन आर्मी निवेदनात म्हटले आहे.
पुढे म्हटले आहे की, “या कारवाईदरम्यान, बलूच लिबेरेशन आर्मीने महिला, मुले आणि बलूच प्रवाशांना सोडले आहे.”