शिमगो हा एक असा उत्सव आहे, ज्यात गोव्याचे सांस्कृतिक सार लोककला, संगीत आणि आकर्षक चित्ररथ भव्य मिरवणुकीत सादर केले जातात. १५ ते २९ मार्च या कालावधीत हा उत्सव सुरू होताच विविध शहरांमध्ये गोव्याचा समृद्ध वारसा दर्शविणारे चित्ररथ, पारंपरिक लोकनत्यृ आणि भव्य मिरवणुका पाहायला मिळतील.
फोंडा येथे १५ मार्चपासून या उत्सवाला सुरुवात होईल. १६ मार्च रोजी मडगाव, १७ मार्च केपे, १८ मार्चला कुडचडे, १९ मार्च शिरोडा, २० मार्च कळंगुट आणि डिचोली, २१ मार्च रोजी वास्को, २२ मार्च रोजी पणजी येथे शिमगोत्सव मिरवणूक होईल.
म्हापसा आणि सांगे येथील रस्ते २३ मार्च रोजी शिमगोत्सव मिरवणुकीने फुलतील, तर २४ मार्च रोजी काणकोण आणि कुंकळळी येथे भव्य मिरवणूक पहायला मिळेल.
२५ मार्च रोजी पेडणे, २६ रोजी धारबांदोडा, २७ वाळपई, २८ रोजी साखळी आणि शेवटी २९ मार्च रोजी मांद्रे येथे मिरवणुकीची सांगता होईल. उत्सवाच्या प्रत्येक दिवशी, विविध ठिकाणांवर भव्य परेड होईल.