kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

धर्मा प्रॅाडक्शन्स – एव्हीके पिक्चर्स घेऊन येत आहेत ‘ये रे ये रे पैसा ३’ !!

धमाल मनोरंजन आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘ये रे ये रे पैसा’ आणि ‘ये रे ये रे पैसा २’ या सुपरहिट चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर, आता या फ्रॅंचायझीचा तिसरा भाग म्हणजेच ‘ये रे ये रे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या १८ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे, बॅालिवूडला एकाहून एक जबरदस्त चित्रपट देणारे धर्मा प्रॉडक्शन्स आणि एव्हीके पिक्चर्स पहिल्यांदाच एकत्र येत असून धर्मा प्रॉडक्शन्स या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे आधीच भव्य असणाऱ्या या चित्रपटाची भव्यता आता आणखीनच वाढणार आहे.

पुन्हा एकदा अण्णा, आदित्य, बबली आणि सनी एकत्र आल्याने मोठा धमाका उडणार असल्याचे दिसतेय. एकंदरच टीझर पाहाता यावेळचा धमाका तिप्पट असणार हे नक्की ! ‘ये रे ये रे पैसा ३’ मध्ये पाच करोडचा घोळ आणि त्यात आलेले नवीन ट्विस्ट काय असतील, हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

धर्मा प्रॉडक्शन्स, अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून वर्डविझार्ड एंटरटेनमेंट यांनी सहनिर्मिती केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते असून संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात,” ‘ये रे ये रे पैसा ३’ हा चित्रपट माझ्यासाठी केवळ एक सिक्वेल नाही, तर प्रेक्षकांचे प्रेम आहे. पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले, त्यामुळे चित्रपटाचा तिसरा भागही त्याच तोडीचा असावा, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. ‘ये रे ये रे पैसा ३’ हा चित्रपटही प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल, याची मला खात्री आहे. हा धमाकेदार चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सगळ्यांनी आपल्या कुटुंबासोबत तयार राहावे.”

निर्माते अमेय खोपकर म्हणतात, ” ‘ये रे ये रे पैसा ३’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मा प्रॉडक्शन्स आणि एव्हीके पिक्चर्स पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. धर्मा प्रॉडक्शनचा हा पहिलाच मराठी सिनेमा असून त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. धर्मा प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने आम्ही प्रेक्षकांसमोर चांगली दर्जेदार कलाकृती सादर करत आहोत. आम्ही चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी एक वेगळा आणि नवीन दृष्टिकोन ठेवला आहे. आम्हाला खात्री आहे की, मागच्या दोन्ही चित्रपटांसारखा तिसऱ्या भागावरही प्रेक्षकवर्ग भरभरुन प्रेम करतील.”

धर्मा प्रॅाडक्शन्सचे अपूर्व मेहता म्हणतात, ‘’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी यापूर्वीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय, की मराठीत आमचे पदार्पण या चित्रपटातून होतेय. एव्हीके पिक्चर्सच्या परिवारासोबत यानिमित्ताने आम्ही जोडले गेलो आहोत. दिग्दर्शक, कलाकार सगळेच नावाजलेले आहेत. त्यांच्यासोबत काम करताना मजा आली.’’