पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. भारत पाक सीमेवर युद्धाचे ढग जमा झालेले असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उद्या बुधवारी (7 मे) देशभरातील 295 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पावलं उचलली जात आहेत. या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी काय करावे, याबद्दलच्या उपायांची माहिती दिली जाणार आहे. या मॉक ड्रिलदरम्यान देशभरात सायरन वाजवले जाणार आहेत. केंद्र सरकारने सर्व सहभागी राज्यांना त्यांच्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षितता योजना अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणाऱ्या सायरनचे संचालन आणि हल्ल्याच्या परिस्थितीत नागरिकांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि ते कसे असेल?
मॉक ड्रिलदरम्यान सर्वत्र ब्लॅकआऊट केला जाईल. ब्लॅकआऊट म्हणजे अंधार करणे. याचा अर्थ असा की, जेव्हा ब्लॅकआऊटचा आदेश येईल. तेव्हा शहरातील सर्व लाईट्स बंद केल्या जातील. रात्रीच्या वेळी सायरन वाजल्यानंतर सर्वत्र अंधार केला जाईल. ब्लॅकआऊट करण्याचे मुख्य कारण म्हणजे शत्रूला त्याचे लक्ष्य शोधण्यात अडचण निर्माण करणे, असे असते. या ब्लॅकआऊटदरम्यान सर्वसामान्यांनी काय करावे, याबद्दल भारत सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यात नागरिकांनी युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे, याबद्दलची माहिती दिली आहे.
ब्लॅकआऊट झाल्यावर काय कराल?
- जेव्हा तुम्हाला सायरन ऐकायला येईल, तेव्हा लगेचच घरातील सर्व दिवे, पंखे आणि इतर विद्युत उपकरणे बंद करा.
- तुमच्या घरात मेणबत्ती, दिवा यांसह इतर कोणत्याही प्रकाशाचा एक छोटासा किरण दिसणे देखील महागात पडू शकते.
- कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका. शांतता आणि संयम राखा, परिस्थितीचा सामना करा.
- जर शक्य असेल तर घरातील सर्वात सुरक्षित ठिकाणी म्हणजे जिथे बाहेरून हल्ला होण्याची शक्यता कमी असेल अशा ठिकाणी आश्रय घ्या.
- आपल्या घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलवा. त्यांना धीर द्या.
- आपल्या आजूबाजूच्या लोकांची विचारपूस करा आणि त्यांना मदत करा.
- सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीसाठी सरकारी सूचनांचे पालन करा.
उद्या होणारे मॉक ड्रिल केवळ एक सराव आहे. परंतु यामुळे भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तुम्हाला या सूचना उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे याला गांभीर्याने घ्या आणि सहकार्य करा. या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.