पाकिस्तानने गुरुवारी (8 मे) रात्री जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोटसह पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील भारतीय लष्करी ठिकाणे व नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. भारताने पाकिस्तानचे हल्ले निकामी केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या हल्ल्यात मुंबई येथील जवानाचा मृत्यू झाला आहे. मुरली श्रीराम नाईक (वय 23) असं मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे. मुरली नाईक हे घाटकोपर येथील कामराज नगर येथील रहिवासी होते. मुरली नाईक यांची पोस्टिंग जम्मू-काश्मीरमधील उरी येथे होती. मुरली नाईक अग्निवीर योजनेअंतर्गत सैन्यदलात भरती झाले होते.
मुरली नाईक यांच्याविषयी :
मुरली नाईक हे डिसेंबर 2022 मध्ये अग्निवीर अंतर्गत सैन्यदलात भरती झाले होते.
मुरली यांचा जन्म मुंबईतच झाला होता. मुरली यांचं कुटुंब आंध्र प्रदेशमधील सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील कल्की तांडा येथील आहे.
त्यांचे वडील श्रीराम नाईक आणि आई ज्योतीबाई नाईक हे कामानिमित्त मुंबईत आले होते.
मुंबईतील घाटकोपरमधील कामराज नगर परिसरामध्ये ते राहत होते. श्रीराम नाईक मुंबईत बिगारी काम करायचे, तर आई ज्योतीबाई या घरकाम करतात.
मुरली नाईक यांचा जन्म 23 ऑक्टोबर 2000 साली मुंबईतील राजावाडी रुग्णालयात झाला होता.
मुरली यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण आंध्र प्रदेशमध्ये घेतलं. हॉस्टेलमध्ये राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं.
मुरली नाईक डिसेंबर 2022 मध्ये अग्निवीर योजनेंतर्गत सैन्यदलात भरती झाले होते. त्यानंतर नऊ महिने त्यांनी नाशिक येथील देवळालीमध्ये ट्रेनिंग घेतलं.
ट्रेनिंग झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांची पोस्टिंग आसाममध्ये करण्यात आली होती.
आसाममध्ये काही महिने सेवा दिल्यानंतर पंजाब येथे ते रूजू झाले होते. काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये त्यांची पोस्टिंग करण्यात आली होती.
मुरली नाईक बंजारा समाजातील होते. त्यांच्या निधनाची बातमी येताच घाटकोपरमधील मुत्तू मारी अम्मा मंदिरामध्ये समाजबांधवांनी आणि घाटकोपरकवासीयांनी गर्दी केली होती.
Leave a Reply