केंद्र सरकार आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजनेत अमुलाग्र बदल करण्याची शक्यता आहे. या योजनेने देशात एका वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. त्यांना सरकारी आणि खासगी दवाखान्यात उपचारांसाठी ही योजना महत्वाची ठरली आहे. बजेटमध्ये केंद्र सरकार या योजनेचा विस्तार करु शकते. तसेच विम्याचे कवच, विम्याची रक्कम दुप्पट करण्याची शक्यता आहे. या योजनेतंर्गत सध्या 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आगामी बजेटमध्ये ही रक्कम 10 लाख रुपये होण्याची दाट शक्यता आहे. कँसर आणि इतर असाध्य रोगांवर उपचाराची सोय करण्यात येऊ शकते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार केंद्रीय अर्थसंकल्पात हे गिफ्ट देऊ शकते.PTI या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, 5 लाख रुपयांहून अधिक खर्च येणाऱ्या कँसर, अवयव प्रत्यारोपण वा इतर असाध्य रोगांच्या उपचारासाठी ही रक्कम वाढविण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय, आयुष्यमान भारत आरोग्य योजनेची विमा रक्कम 10 लाख करण्यासाठी काम करत आहे.

1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अंतरिम बजेटमध्ये हा बदल दिसून येऊ शकतो.आरोग्य मंत्रालयाने, आयुष्यमान भारत पंतप्रधान आरोग्य विमा योजनेचा (AB PM-JAY) विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी, बांधकाम क्षेत्रातील कामगार, खाण कामगार, आशा कार्यकर्त्या यांना योजनेचा थेट लाभ देण्याचा प्रस्ताव असल्याचे समोर आले आहे.

केव्हा सुरु झाली योजना ?

सप्टेंबर 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजना सुरु करण्यात आली होती. गरीब आणि दुर्बल घटकाला उपचार आणि आरोग्य सुविधा पुरविणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. आयुष्यमान भारत अंतर्गत पंतप्रधान जन आरोग्य योजना, AB PM-JAY ही जगातील दुसरी सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ठरली आहे. सरकारी आकड्यांनुसार, सध्या 55 कोटी लोक या योजनेशी जोडण्यात आले आहे. 20 डिसेंबर 2023 रोजी या योजनेतंर्गत 28.45 कोटी आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले.