कॅन्सर या गंभीर आजाराचं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या पाया खालची जमीन सरकते. कॅन्सरचं निदान होण्यासाठी अनेक पद्धतींच्या टेस्ट कराव्या लागतात. मात्र आता अवघ्या एका मिनिटांत कॅन्सरबाबत माहिती मिळू शकणार आहे. IIT कानपूरने एक असं डिव्हाईस तयार केलं आहे, जे ६० सेकंदांच्या आत रिपोर्ट देऊ शकणार आहे.
आता फक्त एका मिनिटात तुम्हाला कॅन्सर आहे की नाही हे कळू शकणार आहे. IIT कानपूरने एक डिव्हाईस तयार केलं असून ते 60 सेकंदामध्ये तुम्हाला रिपोर्ट देणार आहे. हे डिव्हाईस केवळ तोंडाचा कॅन्सर शोधण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. हे डिव्हाईस तोंडाच्या आतील भागाचा फोटो घेऊन आणि त्याचं विश्लेषण करून रिपोर्ट देणार आहे.
या उपकरणाद्वारे कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे हे देखील समजू शकणार आहे. हे डिव्हाईस केमिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट प्रो. जयंत कुमार सिंग यांच्या मदतीने स्कॅन जिनी कंपनीने तयार केलंय. या वर्षी डिसेंबरपर्यंत हे डिव्हाईस बाजारात येण्याची शक्यता आहे.
प्रोफेसर जयंत आणि त्यांच्या टीमने ६ वर्षांमध्ये हे डिव्हाईस तयार केलं आहे. हे एक पोर्टेबल डिव्हाइस असून छोट्या बॅगेतही ते मावण्यासारखं आहे. कानपूरमध्ये अनेक ठिकाणी कॅम्प लावून सुमारे ३ हजार लोकांवर याची चाचणीही करण्यात आली. या उपकरणाद्वारे 22 वर्षांपर्यंतच्या तरुणांमध्ये कॅन्सर आढळून आल्याचं समोर आलं आहे.