आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभेचे आमदार गुरप्रीत गोगी यांचे गोळी लागून निधन झाल्याचे समोर येत आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गोळी लागल्यानंतर आमदारांना तातडीने डीएमसी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिस उपायुक्त (डीसीपी) जसकरण सिंह तेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लुधियाना पश्चिमेतील आप आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांना त्यांच्या खोलीमध्येच गोळी लागल्याची घटना घडली. आवाज ऐकून आमदारांच्या पत्नी डॉ. सुखचैन कौर ताबडतोब खोलीत गेल्या आणि तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना ताबडतोब डीएमसी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आमदार गोगींवर त्याच्याच परवानाधारक पिस्तूलाने गोळीबार झाल्याचे मानले जात आहे. मात्र ही गोळी कोणी झाडली की आमदारांनी स्वतः झाडून घेतली? हा घातपात आहे की अपघात? याबाबतचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी चुकून स्वतःवर गोळी झाडली. त्यांच्या डोक्यात गोळी लागली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
कोण आहेत गुरप्रीत गोगी?
गुरप्रीत बस्सी गोगी हे त्यांच्या समर्थकांमध्ये गोगी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ते येथून विजयी झाले होते. या निवडणुकीत गुरप्रीत सिंह गोगी यांना सुमारे ४० हजार मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार भारत भूषण दुसऱ्या क्रमांकावर होते, तर अकाली दलाचे महेशइंदर सिंग ग्रेवाल तिसऱ्या क्रमांकावर होते.