तब्बल २५ तासानंतर लालबागच्या राजाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. यावेळी एकच भावनिक वातावरण गिरगाव चौपाटीवर भाविकांमध्ये पाहायला मिळालं. राजाला अखेरचं डोळे भरून पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी लालबागच्या राजाच्या विजय असो, ही शान कोणाची… लालबागच्या राजाची असा एकच जयघोष भक्तांनी केला. तर पुढच्या वर्षी लवकर या असेही म्हणत आम्ही आतुरतेने पुढच्या वर्षी वाट पाहत आहोत, अशी साद बाप्पाला घालण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात नव्या उत्साहात विघ्नहर्ता गणरायाचं घराघरात, सार्वजिनक गणेशोत्सव मंडळात वाजत-गाजत आगमन केलं. मुंबईतील गणेशोत्सव अनुभवण्यासाठी राज्यातील देशातील भाविक मुंबई आणि पुण्यात दाखल झाले होते. यादरम्यान, वरूण राजाने जोरदार हजेरी लावली असतानाही भाविकांचा उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळाले. अशातच मुंबईच्या लालबाग परिसरातील लालबागचा राजा याच्या दर्शनासाठी भाविकांनी गणेशोत्सवात मोठी गर्दी केली होती. गेले दहा ते अकरा दिवस मनोभावे पूजा, अर्चना आणि सेवा केल्यानंतर लालबागच्या राजाच्या महाआरती कऱण्यात आली. त्यानंतर लालबागच्या राजाची दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तब्बल २० हून अधिक तासांनंतर लालबाग राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आणि लाडक्या बाप्पाला , लालबागच्या राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. यावेळी एकच भावनिक वातावरण गिरगाव चौपाटीवर भाविकांमध्ये पाहायला मिळालं.