इराण दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून अजून सावरलेला नाहीय. इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. जवळपास 200 इराणी नागरिकांचा दोन बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. इराणच्या या जखमा ताज्या असताना अमेरिकेने आणखी एक घाव घातलाय. इराणने हमास, हुती आणि हेजबोल्ला सारख्या दहशतवादी गटांना पोसून मोठ केलं. इराणच्या शत्रूंना त्रास द्यायचा, हाच या दहशतवादी संघटनांचा एकमेव उद्देश. आता इस्रायल आणि अमेरिका या संघटनांच्या मोहरक्यांना वेचून वेचून संपवत आहे. इराणची एकप्रकारे ही कोंडी आहे. इराणच्या भळाळत्या जखमेवर पुन्हा एकदा अमेरिकेने मीठ चोळलय. इराकमधून बातमी आहे की, अमेरिकेने एक एअर स्ट्राइक केला. त्यात मिलिशिया कमांडर अबू तकवा ठार झाला. अबू तकवाला इराणच समर्थन असल्याच म्हटलं जातं. इराकच्या मध्यभागात अमेरिकेने हा हल्ला केला.

गुरुवारी झालेल्या या हल्ल्याची माहिती आता मीडियाला मिळालीय. इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा तणाव आता इतरत्र पसरू लागल्याच दिसतय. इराकी अधिकाऱ्यांचा अमेरिकेवर मोठा दबाव असताना हे सर्व घडतय. लवकरात लवकर आमचा देश सोडा, म्हणून अमेरिका आणि त्यांच्या नेतृत्वाखाली फौजांवर इराकी अधिकारी दबाव टाकत आहेत.

काय आहे पॉपुलर मोबिलायजेशन फोर्स ?

पॉपुलर मोबिलायजेशन फोर्स म्हणजे पीएमएफ लढवय्यांचा एक समूह आहे. काही प्रमाणात ते इराकी सैन्याच्या नियंत्रणाखाली आहेत. या पीएमएफ संघटनेच्या बगदाद ऑपरेशनचा अबू तकवा डेप्युटी हेड होता. हा अमेरिकेच्या आक्रमकतेचा परिणाम आहे, असं पीएमएफने म्हटलय. एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली की, अमेरिकेनेच गुरुवारी हवाई हल्ला केला. अबू तकवा बऱ्याच काळापासून अमेरिकेच्या रडारवर होता.

अमेरिकेने अबू तकवाला का मारलं?

हरकत अल नुजाबा समूहाचा नेता अबू तकवाने अमेरिकन अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात खास भूमिका बजावली होती. तेव्हापासून अमेरिका अबू तकवाच्या मागावर होती. याचमुळे हरकत अल नुजाबा समूहाला अमेरिकेने वर्ष 2019 मध्ये दहशतवादी संघटना घोषित केले. हरकत अल नुजाबा, पॉपुलर मोबिलायजेशन फोर्स पीएमएफ लढवय्यांचा एक गट आहे.