kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

…आणि रतन टाटांनी एका क्षणात ४५० कोटी रेल्वेला दिले! ; माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितली आठवण

भारताचे ज्येष्ठ उद्योगपती टाटा समुहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे निधन झाल्याची रात्री बातमी आली. ही बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली. त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. टाटा यांच्या निधनाची बातमी रात्री उशीरा आली. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा जीवनप्रवास वयाच्या ८६व्या वर्षी थांबला. सर्वसामान्य कुटुंबीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करून नॅनोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले टाटा यांच्या जाण्याने उद्योगविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तीची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रतनजी टाटा यांच्याबद्दल आठवण सांगितली.

काय म्हणाले पियुष गोयल ?

मी रायपूरमध्ये एकदा रात्री पाहिलं होतं की लहान मुलं तिथे वायफायचा वापर करून अभ्यास करत होते. आम्हाला वाटलं देशभरात प्रत्येक स्टेशनवर वायफाय लावलं पाहिजे. साधारणपणे अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर पुढील वर्षभरात त्यावर काम होतं. मी एकदा सहजच रतन टाटांना सांगितलं की वायफाय लावल्यामुळे फायदा झाला आणि आता सरकार देशभरातल्या सर्व स्टेशनवर वायफाय लावू इच्छित आहे. त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता लगेच सांगितलं की टाटा सन्स यासाठी रेल्वेला पैसा देईल. त्यांचा काहीही संबंध नव्हता तसा. पण त्यांनी त्यांचे सचिव वेंकट यांना आदेश दिला. एका क्षणात त्यांनी ४५० कोटी रेल्वेला दिले. मला आठवतंय शेवटी शेवटी तो प्रकल्प संपेपर्यंत आम्हाला आणखी थोड्या निधीची आवश्यकता होती. एवढ्यासाठी टाटांना कसं विचारायचं? असा प्रश्न आम्हाला पडला होता. पण तेव्हा वेंकट म्हणाले की टाटांनी ही जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे रेल्वेला या प्रकल्पासाठी जो काही निधी लागेल, तो आम्ही देऊ.