kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांची दुसरी पोस्टही चर्चेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. परंतु, त्यांचे सुपूत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तसंच, ठाकरे गटानेही या जागेवरून उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी आज एक ट्वीट करून खळबळ माजवली. परंतु, त्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलिट करून आता सारवासारव केली आहे.

अयोध्या पौळ यांनी दुपारी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने मशाल चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा लढवत आहे. ज्यांच्याकडे ईडी (अंमलबजावणी संचालनालय), आयटीसारखी (आयकर विभाग) ताकद आहे, स्वयंघोषित जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा पक्ष ज्यांच्याबरोबर युतीत आहेत अशा मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, वरुण सरदेसाई आणि साईनाथ दर्गे यांचे आभार.या पोस्टवरून चर्चा सुरू होताच अयोध्या पौळ यांनी ही पोस्ट डिलीट केली. त्यानंतर त्यांना खरंच उमेदवारी मिळाली आहे की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती.

तसंच, ठाकरे गटाकडूनही याबाबत खुलासा करण्यात आला नाही. दरम्यान, आता अयोध्या पौळ यांनी स्वतःहून याबाबत पोस्ट करून खुलासा केला आहे.अयोध्या पौळ यांची नवी पोस्ट काय?“आज परिक्षा संपल्या एकदाच्या. आता लोकसभा-विधानसभेसाठी ऊर्जेने कार्यरत…. “एप्रिल फूल” ची पोस्ट शुभचिंतक व विरोधकांना इतकी आवडली की ३ तासांत २२८ मिसकाॅल आले. श्रीकांतच काय आदरणीय साहेबांनी आदेश दिले तर मोदी साहेबांच्या विरोधात पण उमेदवारी अर्ज दाखल करेल. आम्ही साहेबांचा आदेश मानणारे कट्टर अन् निष्ठावंत. धोका देऊन पळून जाणारे गद्दार नाहीत. कशाला नाद करता आमच्या साहेबांचा”, असं अयोध्या पौळ म्हणाल्या आहेत.