Breaking News

भारताचे 51 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजीव खन्नांची नियुक्ती

देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश संजीव खन्ना यांनी शपथ घेतली. आज (11 नोव्हेंबर) राष्ट्रपती भवनात संजीव खन्ना यांच्या सरन्यायाधीश पदाचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून खन्ना यांनी कार्यभार स्वीकारला. संजीव खन्ना यांनी अनेक ऐतिहासिक खटल्यांचा निकाल दिला आहे. कलम 370 रद्द करणे, इलेक्टोरल बॉण्ड रद्द करणे अशा अनेक महत्त्वाचे निर्णय देणाऱ्या खंडपीठाचे ते सदस्य होते.

भारताचे नवे सरन्यायधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 13 मे 2025 पर्यंत असणार आहे. नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान 26 एप्रिल रोजी त्यांनी VVPAT आणि EVM यांच्यातील मतांची 100 टक्के जुळवाजुळव करण्याची मागणी फेटाळून लावली. त्यासोबतच संजीव खन्ना यांनीच इलेक्टोरल बाँण्ड असंवैधानिक असल्याचा निर्णय दिला होता. तसेच त्यांनी मुख्य न्यायाधीश कार्यालयाला माहिती अधिकारात आणण्याचा निर्णय दिला होता.

संजीव खन्ना यांनी दिल्लीच्या मॉडर्न स्कूल आणि सेंट स्टिफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतलेलं आहे. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतलेली आहे. त्यांनी 1983 साली तीस हजारी कोर्टात वकिलीला सुरुवात केली होती. 2005 साली ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. जानेवारी 2019 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *