भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे. त्याने पहिल्यांदाच ५ बळी घेत खळबळ उडवून दिली आहे. यामुळे रणजी ट्रॉफी प्लेट गटातील मॅचमध्ये गोवा मजबूत स्थितीत पोहोचला आहे.
आयपीएल लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरने या कामगिरीच्या बळावर सर्व फ्रँचायझींचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे.
रणजी ट्रॉफीच्या प्लेट मॅचमध्ये अरुणाचल प्रदेशला पहिल्या दिवशी गोव्याने ८४ धावांत गुंडाळले. यामध्ये अर्जुन तेंडुलकरची मोठी भूमिका होती. अर्जुनने नीलम ओबी, नबाम हाचांग, चिन्मय पाटील, जय भावसार आणि मोजी एटे यांना बाद केले.
अर्जुन तेंडुलकरला मोहित रेडकर (३/१५) आणि कीथ पिंटो (२/३१) यांची चांगली साथ लाभली. अरुणाचल प्रदेशचा डाव ३०.३ षटकांवर आटोपला.
अर्जुनची हॅटट्रिक हुकली
अर्जुन तेंडुलकरने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात हाचांगची (०) विकेट घेत डावाला सुरुवात केली. १२व्या षटकात लागोपाठच्या चेंडूंवर ओबी आणि भावसार यांना बाद केल्यानंतर त्याला हॅट्ट्रिकची संधी होती. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली.
पाटील आणि एटे यांनी शेवटच्या दोन विकेट्स घेतल्या. अर्जुनचे हे यश अशा वेळी आले आहे, जेव्हा आयपीएल ऑक्शन अवघ्या काही दिवसांवर आले आहे.
अशा परिस्थितीत अर्जुन आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात मोठे आकर्षण ठरणार आहे. अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
अर्जुन तेंडुलकर याने २०२३ साली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. मुंबई इंडियन्सकडून खेळताना, अर्जुन तेंडुलकरने त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामात एकूण ४ सामने खेळले आणि त्याला केवळ ३ विकेट घेता आल्या.
२०२४ मध्ये अर्जुन तेंडुलकरने फक्त एकच सामना खेळला होता. दोन हंगामात अर्जुनने एकूण ५ सामने खेळले असून ३ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याला फलंदाजी कशी करायची हे देखील माहित आहे, तो चांगला ऑलराऊंडर होऊ शकतो.