बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून १८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे टीम इंडिया आता मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गुणतालिकेतही भारताला धक्का बसला आहे. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माही निराश दिसला. रोहित शर्माने भारताच्या पराभवाचे कारणही सांगितले.
भारताच्या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला, “खूप निराशाजनक. आम्हाला शेवटपर्यंत कडवी लढत द्यायची होती पण दुर्दैवाने आम्ही ते करू शकलो नाही. केवळ शेवटच्या सत्राचे मूल्यांकन करणं कठीण होईल. संपूर्ण कसोटी सामना पाहावा लागेल, आमच्याकडे संधी होती पण आम्ही त्या संधीचा योग्य फायदा घेऊ शकला नाही आणि ऑस्ट्रेलियाचा संघ ६ बाद ९० धावांवर असताना त्यांना सामन्यात पुनरागमन करू दिले. मला माहित आहे की गोष्टी कठीण होऊ शकतात, परंतु आम्ही त्यासाठीच खेळत आहोत, आम्हाला कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी करता येईल यासाठी खेळायचे होते.”
रोहित शर्मा पराभवाचे कारण सांगत पुढे म्हणाला, “मी याबाबत खूप विचार केला की एक संघ म्हणून आम्ही आणखी काय करू शकलो असतो, पण आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने चांगलाच तडाखा दिला. त्यांच्या तळाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. शेवटच्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीत त्यांनी कडवी झुंज दिली. आम्हाला संधी होती पण आम्ही त्याचा फायदा उठवू शकलो नाही. कदाचित त्या क्षणीच आम्ही सामना गमावला.”
रोहित पुढे म्हणाला, “आम्हाला माहीत होते की ३४० धावा करणं आमच्यासाठी सोपं असणार नाही. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले, जर आम्हाला दोन सत्रात विकेट मिळाल्या असत्या तर आम्ही लक्ष्य गाठू शकलो असतो, परंतु त्यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली.”
नितीश रेड्डीच्या शतकाबाबत रोहित शर्मा म्हणाला, नितीश रेड्डी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच आला आहे, इथे कठिण परिस्थितीत खेळावं लागतं, पण त्याने शानदार कामगिरी केली. यायचबरोबर तो चांगल्या टेक्निकने खेळला. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यांच्याकडे यशस्वी होण्याची सर्व कौशल्ये आहेत. त्याचं कौशल्य आणि त्याची खेळण्याची पद्धत आम्हाला माहित आहे आणि आम्ही त्याला अनेक वर्षांपासून खेळताना पाहत आहोत. त्याला फक्त इथे येऊन देशासाठी खेळायचे आहे, हेच तो या दौऱ्यावर करत आहे, दुर्दैवाने त्याला दुसऱ्या टोकावरून हवी तितकी साथ मिळाली नाही. पण तो ज्यापद्धतीने खेळला आहे ते कमालीचं आहे.