उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने रोज लाखो भाविक दाखल होत आहेत. महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक दिग्गजांनीही पवित्र स्नान केलं आहे. काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलं होतं. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महाकुंभमेळ्याला भेट देत संगम स्थानी पवित्र स्नान केलं होतं. आज रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देखील महाकुंभमेळ्यात दाखल होत कुटुंबासह प्रयागराज येथील संगमावर पवित्र स्नान केलं आहे.
देशातील विविध ठिकाणांहून प्रयागराजमधील महाकुंभाला मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. या ठिकाणी येऊन संगमावर दररोज लाखो भाविक पवित्र स्नान करत आहेत. तसेच माघ पौर्णिमेच्या स्नानोत्सवानिमित्त मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. माघ पौर्णिमा स्नानाला महत्व असल्याने प्रयागराजमध्ये भाविकांची आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी हे महाकुंभमेळ्यात कुटुंबासह दाखल होत संगमावर पवित्र स्नान केलं. त्यांच्याबरोबर अनंत आणि आकाश अंबानी यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब घाटावर बोटीतून फिरताना दिसले. यावेळी त्या ठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू झाला असून २६ फेब्रुवारीपर्यंत हा मेळा चालणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाकुंभात साधू आणि भक्तांची मोठी गर्दी झाली असल्याचे चित्र आहे. धार्मिक श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक असणाऱ्या या मेळ्यात लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी येतात. महाकुंभाचा दुसरा दिवस आणि पहिले अमृतस्नान १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर झाले आहे. अमृतस्नानाला शाही स्नान देखील म्हटले जाते.