बीड लोकसभा मतदारसंघात इतिहास घडला आहे. आज पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे यांनी एकत्र गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले. त्यामुळे पंकजा यांना भावाची साथ मिळणार हे स्पष्ट झालं आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा गोपीनाथ गडावर आली आहे. माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मी सांगितले होती की मी तुमच्या घरी येणार आहे. तुम्ही राष्ट्रवादीचे नेते आहात, पालकमंत्री आहात मला कामात मदत करा. पण मला त्यांनी सांगितलं मी गोपीनाथ गडावर येतो. आता गोपीनाथ गडावर भाऊ आलाय पण पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मी त्यांच्या घरी जाणार आहे.”
धनंजय मुंडे म्हणाले, हा माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. ताईंना उमेदवारी मिळाली. घरात मी मोठा आहे, त्यामुळे मी स्वत: भाऊ म्हणून आलो. त्यांनी माझ्या घरी येण्यापेक्षा मी त्यांच्या भेटीसाठी येणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं होत.
काही नेते महायुतीच्या बाहेर जाऊन उमेदवारी मागत आहेत, यावर धनंजय मुंडे म्हणाले, त्यांची ऐपत मला माहीत आहे. त्यांना त्यांच्या मुलीला ग्रामपंचायतीत देखील निवडून आणता आलं नाही.बहिणीच्या मागे मोठा भाऊ म्हणून ताकदीने मी उभा आहे. ताईंच्या राजकारणातील सुरुवातीला २००९ ला मी ताईंचा प्रचार केला. या २०२४ च्या निवडणुकीत मी ताईंचा प्रचार करणार हे मुंडे साहेबांचे आशिर्वाद आहेत. तेव्हा मुंडे साहेब हयात होते. आज ते नसताना माझे वडिल नसताना मोठा भाऊ म्हणून मी ही जबाबदारी घेणं माझं कर्तव्य आहे. देशाला विजय गर्व वाटावा असा विजय पंकजा मुंडेंचा होणार आहे.