आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त बदलण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले होते. त्यानंतर आज भूषण गगराणी यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबत एक महत्त्वाची ऑर्डर समोर आली होती. या ऑर्डरमध्ये ठाणे महापालिका आयुक्तांसह आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर आज तीन बड्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची माहिती समोर आली आहे. भूषण गगराणी यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी, सौरभ राव यांना ठाणे महापालिका आयुक्तपदी आणि कैलाश शिंदे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला मुंबई महापालिकेच्या विद्यमान आयुक्तांना हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार इक्बाल सिंह चहल यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन हटवण्यात आलं आहे. यानंतर राज्य सरकारने भूषण गगराणी यांना आयुक्त म्हणून नियुक्त केलं आहे. भूषण गगराणी हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे नगरविकास, जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागांची जबाबदारीदेखील होती.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अमित सैनी यांनी आज (दिनांक २० मार्च २०२४) सकाळी पदभार स्वीकारला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्याकडून डॉ. सैनी यांनी हा पदभार स्वीकारला. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी डॉ. सैनी यांचे स्वागत केले. नवनियुक्त अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख कर्मचारी अधिकारी श्रीमती रिमा ढेकणे यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.