kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! बांग्लादेशच्या पंतप्रधानांचा राजीनामा, लष्कर प्रमुख लवकरच करणार मोठी घोषणा

देशाच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका सोडले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशात हिंसक निदर्शने सुरु आहेत. पंतप्रधान हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या लाखो निदर्शकांनी कर्फ्यूला झुगारून राजधानीच्या रस्त्यावर मोर्चा काढला आणि पंतप्रधानांच्या घरात प्रवेश केला. ढाक्यामध्ये चिलखती वाहनांसह सैनिक आणि पोलिसांनी सुश्री हसिना यांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गांवर काटेरी तारे लावली होती. परंतु मोठ्या गर्दीने हे सर्व अडथळे तोडून टाकले आहेत.

बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. बांग्लादेशचे लष्कर प्रमुख लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचं बोललं जातं आहे. कालच्या भीषण चकमकींमध्ये तब्बल 98 लोक मारले गेले. त्यानंतर आता बांगलादेशचे लष्करप्रमुख वाकर-उझ-झमान राष्ट्राला संबोधित करणार आहेत. गेल्या महिन्यात निदर्शने सुरू झाल्यापासून मृतांची संख्या 300 वर पोहोचली आहे. पंतप्रधान शेख हसिना यांच्या 15 वर्षांच्या राजवटीच्या सर्वात वाईट काळ हा ठरला आहे. देशात अशांतता वाढली आहे. संपूर्ण बांगलादेशात निदर्शने व्यापक झाली असून सरकारविरोधी चळवळ वाढली आहे. लोकांच्या पाठिंब्याचे आवाहन करणारी गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत बांगलादेशातील विद्यार्थी सोमवारी राजधानी ढाका येथे लाँग मार्चसाठी जमले आहेत. वृत्तानुसार, या आंदोलनाचे समन्वयक आसिफ महमूद म्हणाले की, ‘या सरकारने अनेक विद्यार्थ्यांची हत्या केली आहे. आता वेळ आली आहे की सरकारला त्यांच्या कृत्याचा हिशोब द्यावा लागेल.’

विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. ते म्हणाले की, आम्हाला मोर्चा काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. माझ्या सैन्य बांधवांना सांगायचे आहे की, हुकूमशहांना पाठिंबा देऊ नका. एकतर तुम्ही लोकांना पाठिंबा द्या किंवा निष्पक्ष रहा. यासोबतच या मुदतीत बंद झालेली सर्व विद्यापीठे पुन्हा सुरू करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटमही सरकारला देण्यात आला आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटले आहे. त्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र झाले. 4 जुलै रोजी झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत त्यांनी आंदोलकांशी कठोरपणे वागण्याचे आदेश दिले होते. त्यांनी या आंदोलनादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती.

शेख हसीना सरकारने या निदर्शनांवर एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, देशात वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले होत आहेत. हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून देशभरात तीन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.