kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! बांगलादेशींना प्रवेश मिळणार नाही, हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आसामच्या हॉटेल मालकांचा निर्णय

बांगलादेशातील परिस्थिती काय आहे हे सध्या संपूर्ण जगाला माहित आहे. येथे अल्पसंख्याकांना कसे लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात देखील अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या आसाममधील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाल्याचे चित्र समोर आले. आता बराक व्हॅलीमधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये बांगलादेशी ग्राहकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत हिंदू समाजातील लोकांवर होणारे हल्ले थांबत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही बांगलादेशींना मदत केली जाणार नाही, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

बराक व्हॅली प्रदेशात कचर, श्रीभूमी (पूर्वीचे करीमगंज) आणि हैलाकांडी या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. ही दरी बांगलादेशच्या सिल्हेट प्रदेशाशी १२९ किमी लांबीची सीमा सामायिक करते. हॉटेल आणि रेस्टॉरंटवर बंदी घालण्यापूर्वी श्रीभूमी जिल्ह्यातील आयात-निर्यात असोसिएशनने बांगलादेशसोबतचे सर्व व्यापारी संबंध स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय.

बराक व्हॅली हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबुल राय म्हणाले की, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांची परिस्थिती चिंताजनक आहे. हे आम्ही स्वीकारू शकत नाही. जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही, हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांमध्ये शेजारील देशातील एकाही नागरिकाला परवानगी दिली जाणार नाही. आमचा निषेध व्यक्त करण्याचा हा प्रकार आहे. ते म्हणाले की, बांगलादेशच्या जनतेने देशात स्थिरता परत येईल याची खात्री करावी. परिस्थिती सुधारली तरच आम्ही आमच्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतो.

अलीकडेच त्रिपुरामध्ये ऑल त्रिपुरा हॉटेल आणि रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनने बांगलादेशी लोकांना रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्यास नकार दिला होता. हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. शेजारील देशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बांगलादेशातील कोणत्याही रुग्णावर उपचार करणार नसल्याची घोषणा यापूर्वी आयएलएस रुग्णालयाने केली होती.