आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे जवळपास सर्वच मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीला, अशोक उईके, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, गणेश नाईक, शिवेंद्र राजे, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, जयकुमार रावल, संजय सावकारे, नितेश राणे, मेघना बोर्डीकर गिरीश महाजन, आशिष शेलार, राहुल नार्वेकर यांची उपस्थित होती. या बैठकीनंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
देवेंद्रजी यांच्याकडे जी बैठक झाली, त्या बैठकीला सर्व मंत्री, सभापती आम्ही हजर होतो सदस्य नोंदणी सुरू आहे, १ कोटी ३५ लक्ष सदस्य संख्या पूर्ण झाली आहे, १६ लक्ष बाकी आहे, घरी जाऊन प्राथमिक सदस्यता पूर्ण होईल. ३ लक्ष अँक्टिव्ह मेंबर घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. ३० मार्च पर्यंत तालुका अध्यक्ष निवडले जातील, त्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक बुथवर 12 लोकांची समिती असेल असं या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं आहे. सभागृहात पूर्णवेळ थांबून कामकाज करणार आहोत, आमचा परफॉर्मन्स चांगला असेल, महायुतीचे आमचे सर्व मंत्री उपस्थित राहतील, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मंत्री धनंजय मुंडे तसेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे, तसेच धनंजय मुंडे यांनी दोनच दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे, असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला होता. याबाबत बावनकुळे यांना विचारले असता, याचा तपास सुरू आहे, कोणालाही सोडणार नाही, तपास यंत्रणांचा रिपोर्ट येत नाही, तोवर यावर बोलणं योग्य नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. विरोधकांकडून सातत्यानं धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.