बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे म्हंटले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. सध्या बीड हत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून केली जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी बीड पोलीसही करत आहेत. त्यात आता वाल्मिक कराडबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराड हा महाराष्ट्राच असून सीआयडीचे विशेष पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले आहे. आजपासून सीआयडीच्या आणखी ४ टीम वाल्मिक कराडचा शोध घेणार आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून जप्ती सुरु झाली आहे. सीआयडीकडून या प्रकरण खंडणी, हत्या, अॅट्रोसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. यात वाल्मिक कराडची १०० हून अधिक बँक खाती गोठवली गेली आहे. त्यासोबतच वाल्मिक कराडची आणखी कोणत्या बँकेत खाती आहेत, याचाही शोध सुरु आहे. या जप्ती संदर्भातील पत्र सीआयडीकडून उच्च न्यायालयात देण्यात आले आहे.