आज गोरेगावात वडापाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. .या महोत्सवाला अनेक कलाकार मंडळींनी देखील हजेरी लावली होती. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मंचावरुन वडापावचं भरभरुन कौतुक केलं तसंच राज्य सरकार मिश्किल टीप्पणी केली. हा वडापाव पाहिला की मला राज्य सरकारची आठवण येते, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारला वडापावची उपमा दिली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वडा अजित पवार आहे, की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वडा हा एकनाथ शिंदे आहे की त्या दोघांमधला वडा देवेंद्र फडणवीस आहेत, हेच कळत नाही.
वडापावचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या दिवंगत अशोक वैद्य यांचं संपूर्ण कुटुंब देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी अशोक वैद्य यांना महाराष्ट्र भूषण जाहीर करावा अशी मागणी देखील यावेळी राज ठाकरेंनी केली.आज हा वडापाव अनेक ठिकाणी पोहचलाय. पण मी आजपर्यंत वाईट वडापाव कुठेही खाल्ला नाही. खरंतर हे अशोकरावांचे आभार की त्यांनी कित्येक पिढ्या घडवल्या आणि गाड्या उभ्या करण्याची संधी दिली, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरची देखील वडापाव बद्दलची आठवण यावेळी राज ठाकरेंनी सांगितली.