Breaking News

हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!

इस्रायली लष्कराच्या घोषणेनंतर, आता हिजबुल्लाह ने ही, आला नेता तथा संघटनेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या हसन नसरल्लाहचा इस्रायली हवाई हल्ल्यात खात्मा झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच, आपले सहकारी नसरल्लाह शहीदांमध्ये सामील झाल्याचे म्हटले आहे.

एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने शनिवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, नसरल्लाह आपले सहकारी शहीदांमध्ये सामील झाले आहे. एवढेच नाही तर, हिजबुल्लाह शत्रू विरोधात आणि पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ पवित्र युद्ध सुरू ठेवण्याची शपथ घेत आहे, असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

नसरल्लाहने तीन दशकांपेक्षाही अधिक काल दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचे नेतृत्व केले. त्याच्या मृत्यूमुळे मध्य पूर्वेतील संघर्ष नाट्यमय रित्या बदलू शकतो, असे बोलले जात आहे.

तत्पूर्वी, शुक्रवारी इस्रायलने हिजबुल्लाहवर मोठा हल्ला करत बेरूतमधील त्यांच्या मुख्यालयाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाह मारला गेल्याचा दावा इस्रायली लष्कराने शनिवारी केला होता. यानंतर आता खुद्द हिजबुल्लाहनेही याची पुष्टी केली आहे.

कोण होता नसरल्लाह?

सय्यद हसन नसरल्लाहचा जन्म ३१ ऑगस्ट १९६० रोजी लेबनॉनची राजधानी बेरूतच्या उत्तरेकडील बुर्ज हमौद येथे झाला होता. हसन नसरल्लाहचे त्याच्या वडिलांनी अत्यंत गरिबीत पालनपोषण केले. त्यांचे एक छोटे दोकान होते. 1992 मध्ये हसन नसरल्लाह हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनला. इराणच्या पाठिंब्याने हसन नसरल्लाहने लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटना अतिशय मजबूत आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केली. दरम्यान, हिजबुल्लाहचे इस्रायलशी असलेले शत्रुत्व नवीन नाही, उलट हिजबुल्लाहची स्थापनाच इस्रायलविरोधात होती.

हसन नसरल्लाह नेहमी आपले ठिकाण बदलत होता. कारण शत्रू केव्हीही आपल्यावर हल्ला करू शकत याची त्याला भीती होती. मात्र, यावेळी हसन नसरल्लाह इस्रायली सैन्याच्या नजरेतून स्वत:ला वाचवू शकला नाही. दरम्यान, हसन नसरल्लाहची चार मुलंही हिजबुल्लाहशी संबंधित होती. त्याचा मोठा मुलगा हिजबुल्लाह सेनानी होता आणि तो 1997 मध्ये इस्रायली हल्ल्यात मारला गेला.

हसन नसरल्लाह हा 1975 मध्ये लेबनॉनमधील गृहयुद्धात सक्रिय होता. तो इस्रायलच्या लेबनीज भूभागाच्या विरोधात होता. तेव्हापासून त्याचे इस्रायलशी जास्त वैर निर्माण झाले होते. हसन नसरल्लाह पूर्वी शिया मिलिशिया संघटनेचा सदस्य होता. नंतर हिजबुल्लाहमध्ये सामील झाला. 1992 मध्ये हिजबुल्ला प्रमुख सय्यद अब्बास मुसावीची हत्या झाली. त्यानंतर हसन नसरल्लाह हा हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनला होता.