सध्या सर्वत्र बांगलादेश, शेख हसीना आणि बांगलादेशाची परिस्थिती या गोष्टींची चर्चा होत आहे. १७ कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात शेख हसीना यांचं २००९ पासून सरकार सत्तेत होतं. शेख हसीना यांनी सुमारे १५ वर्षं सत्ता गाजवली आहे. बांगलादेशनं मागील दशकभरात जी प्रगती साधली, आर्थिक विकास करत अर्थव्यवस्थेला जी गती दिली त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणात शेख हसीना सरकारलं दिल गेलं. मात्र, सरकारी नोकरीत आरक्षण हटवण्याच्या मागणीवरून निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळल्यावर शेख हसीना यांना पद आणि देश दोन्ही सोडावं लागलं आहे.
बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांच आंदोलन वाढलं त्याच देशव्यापी निदर्शनात रूपांतर झालं आणि ते शेख हसीना यांचं सरकार पडण्यास कारणीभूत ठरलं. लष्करानं देशात अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. आणि हळूहळू संपूर्ण जगानं याची खबर घेतली. आंदोलन आणि बांगलादेशात पुढे काय होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्याची परिस्थिती अनिश्चिततेने भरली आहे.
खरतर , बांगलादेशच्या आर्थिक मॉडेलची सर्वत्र चर्चा होत होती.बांगलादेशनं गेल्या वर्षात साधलेल्या आर्थिक प्रगतीनं फक्त दक्षिण आशियाच नाही, तर सगळं जगच चकित झालं होतं. असं असून देखील हळूहळू बांगलादेशातील परिस्थिती बदलू लागली. पाहता पाहता आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल होत, हा देश अस्थिरतेच्या गर्तेत फेकला गेला.