पुणे शहरात दहशत निर्माण करणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील नाना पेठ इथं गोळीबार करण्यात आला.

शहरातील गजबजलेल्या भागात हल्लेखोर चार ते पाच गाड्यांवरुन आले अन् एखाद्या चित्रपटाप्रमाणे वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला सुरु केला. वनराज आंदेकर हल्लेखोरांना पाहताच पळू लागले. परंतु गाडीवरुन उतरत हल्लेखोरांनी गोळीबार सुरु केला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात 12 हल्लेखोर दिसत आहे. त्यात काही जणांकडे शस्त्र आहे.

कौटुंबिक वाद आणि पैस यातून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतल्या डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर थांबले होते, तेव्हा त्यांच्यावर हल्लेखोराने बंदुकीतून पाच राऊंड फायर केले. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. गोळीबाराच्या आधी डोके तालीम भागामध्ये वीज पुरवठाही खंडीत झाल्याची माहिती मिळत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हा गोळीबार झाल्यामुळे नाना पेठ परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे.

वनराज आंदेकर हे 2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगसेवक म्हणून निवडून आले होते. 2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते. त्याआधी वनराज यांची आई राजश्री आंदेकर या नगरसेवक होत्या. 2007 आणि 2012 अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भुषवलं होतं. तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक होते. वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या.

गेल्या पंचवीस वर्षांपासून आंदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात होता. प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराज आंदेकरचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झालीय. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. सूर्यकांत आंदेकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या असून 1985 पासून अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

आंदेकर माळवदकर टोळीयुद्धात खून प्रकरणी सूर्यकांत आंदेकर जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आला. बाहेर आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरूच होती. दहशतीमुळे स्थानिकही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. आंदेकर टोळीकडून अलिकडेच अतुल कुडले याच्या खुनाचाही प्रयत्न झाला. वर्चस्व कमी होत असल्याच्या रागातून हा प्रयत्न केला असल्याची माहिती समजते.

वनराजचे वडील बंडू आंदेकर याच्यासह आंदेकर कुटुंबाचा टोळीशी संबंधित कारवायांचा कुप्रसिद्ध इतिहास आहे. नुकतेच बंडू आंदेकरसह इतर सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याआंतर्गत (मकोका) आरोप ठेवण्यात आले होतं, पण याप्रकरणी जामीन मिळाला होता. वनराज आंदेकरवर हल्ला करणाऱ्यांमध्ये गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम अशी संशयितांची नावं आहे. पोलीस सध्या मारेकऱ्यांच्या शोधत आहेत.

पुणे पोलिसांनी या हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहे. त्यात पाच ते सहा गाड्यांवर 12 युवक सोबत आलेले दिसत आहे. ते गाडीवरुन उतरुन वनराज आंदेकर यांच्या दिशेने जाऊ लागले. आपल्यावर हल्ला होणार हे कळताच आंदेकर जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्यावेळी एका हल्लेखोरांची गोळी त्यांच्या कानाजवळून गेली. आंदेकर रक्तबंबाळ झाल्यानंतर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळावरुन फरार झाले. चित्रपटात ज्या पद्धतीने गुंड हल्ला करुन पसार होतात, तिच पद्धत हल्लेखोरांची दिसली.

वनराज आंदेकर हत्येमागे परिसरातील नाना पेठेतील सूरज ठोंबरे याचाही हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पुण्यातील नाना पेठेत आंदेकर टोळीच्या गुंडांनी सूरज ठोंबरे टोळीतील दोघांवर हल्ला केला होता, त्यात दोन जण ठार झाले होते. आता वनराज आंदेकर यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे पुण्यातील गुन्हेगारी टोळीशी संबंधित वाढत्या कारवायांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कोथरूडमध्ये गँगस्टर शरद मोहोळ याचीही भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *