गेली ४ दशके बाळासाहेबांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले व उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रविंद्र वायकर यांना गेले वर्षभर मानसिक छळ करून व दबाव टाकून रविंद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी पळवले. ते जरी तनाने शिंदे गटात गेलेले असले तरी ते मनाने मातोश्री सोबतच असतील. असे बळजबरी करून नेते व कार्यकर्ते मिंधे सेनेत पळवून नेले जात असले तरी मिंधेची शिवसेना वाढणार नसून ती सूज असेल.

रविंद्र वायकर हे शिवसेनेचे २० वर्षे नगरसेवक व दोन वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते. उद्धव ठाकरेंच्या मंत्री मंडळात ते मंत्रीही होते. गेले वर्षभर त्यांच्यावर विविध आरोपांची राळ उठवून जेरीस आणले. काही काळासाठी पक्ष बदलला तर तुरूंगवास टळेल ! याच मानसिकतेतून त्यांनी मिंधेसेनेची वाट धरली असली तरी मिंधे गटाचा नायनाट होताच सर्वात प्रथम ते मातोश्रीकडे धाव घेतील. कदाचित मातोश्रीच्या सहमतीनेच वायकर मिंधे गटात हंगामी स्वरूपात गेले असावेत.

नात्यांच्या ताटातूटीचे दु:ख एकनाथ शिंदे यांनी १९९९ साली अनुभवले आहे. नियतीने या दु:खाची व वेदनेची जाणीव २५ वर्षांपुर्वी त्यांना करून दिली असली तरी एकनाथ शिंदेंनी त्यापासून काही बोध घेतलेला दिसत नाही. इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागत नाही. नियती अशा लोकांवर नक्कीच सूड उगवते.आसामची ती कामाख्या देवी असो वा आमच्या मालवणची भराडी देवी, त्यांनी कितीही नवससायास केले, तरी त्या अशा गद्दार व कृतघ्नांना कधीच पावत नसतात.

तुम्ही वायकरांना, त्यांच्या कुटुंबीयांना व मतदारांना जे दु:ख देत आहात, त्यांचे तळतळाट तुम्हाला आज ना उद्या भोगावेच लागतील, हे मात्र नक्की..आज तुम्हाला आसूरी आनंद होत असेल की ऐन लोकसभेच्या तोंडावर मुळ शिवसेनेवर आघात केला, एक निष्ठावंत आपल्याकडे वळवला ! हा तुमचा भ्रम आहे. तुमच्या पापाच्या घड्यात अजून एक खडा टाकलात ! विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचा पक्षपाती व संविधान विरोधी निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. लोकसभा निवडणूकी पुर्वी जर सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांचा निर्णय बदलला व तुमच्यासह १६ आमदारांना अपात्र घोषित केले तर तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही. आत्ताच जागा वाटपावरून तुमची जी नाचक्की होत आहे त्यामुळे तुमच्या इभ्रतीचा फालूदा झालाच आहे.

अहंम् ब्रम्हास्मी !”या गर्वात राहू नका, नियती कधीही उधारी ठेवत नाही, ती चक्रवाढ व्याजाने वसूली करते. मग ती कामाख्या देवी असो की नुकतेच नाक रगडून आलात ती आमची भराडी देवी ! गद्दारांना योग्य वेळी कठोर शासन करते म्हणूनच त्यांचा महिमा अगाधआहे. त्याचा प्रत्यय महिन्याभरात तुम्हाला आला नाही तर मग बोला !

दिलीप मालवणकर
ज्येष्ठ शिवसैनिक