kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अभिजात दर्जामुळे देशातील ४५० विद्यापीठात मराठी शिकण्याची सोय: ॲड विलास पाटणे

कवी कुसुमाग्रज यांची मुलाखत रत्नागिरीत घेण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य समजतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यामुळे देशातील ४५० विद्यापीठात मराठी शिकण्याची सोय होईल याच स्वागतच आहे परंतु भाषा संवर्धनाचे प्रश्न त्यातून सुटणार नाही. गल्लोगल्ली मराठीचा वापर वाढणार नाही, दर्जेदार साहित्य निर्मिती होणार नाही, मराठी शाळांना चांगले दिवस येणार नाहीत.

इंग्रज व्यापार व युद्धानिमित्ताने जगभर जाताना आपली भाषाही घेऊन गेले. काळानुरूप बदलण्याचा प्रवाहीपणा इंग्रजीने दाखवला असे प्रतिपादन लेखक व रत्नागिरी बारचे अध्यक्ष ॲड विलास पाटणे यांनी देव, घैसास, कीर महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित केले.

तमिळ मलेशिया, इंडोनेशिया आदी देशांमध्ये व्यापारानिमित्त स्थायिक झाले. यामुळे मलेशियामध्ये आज तमिळ भाषिक तब्बल १५ टक्‍क्‍याच्या आसपास आहे. तमिळ ही मलेशियाची पाचवी अधिकृत भाषा आहे. कॅनडामध्ये पंजाबी लोक १९ व्या शतकाच्या मध्यापासून गेले. आज कॅनडात पंजाबी ही ३ राजभाषांपैकी एक आहे.

राज्यकर्त्यांमध्ये मराठी एक लोकभाषा, व्यवहार भाषा आणि ज्ञानभाषा होण्याचे दृष्टीने प्रयत्नांचा अभाव दिसतो.मराठी शाळांचे खच्चीकरण आणि इंग्रजी शाळांचे वाढते प्रमाण आता खेड्यापाड्यात पोहोचले आहे. तब्बल ८६ टक्के विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाला पसंती दिल्याने एकूणच मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता वाटते. शासन १४९८५ मराठी शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत ” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

ॲड पाटणे पुढे म्हणाले “मराठी ज्ञानभाषा झाली तरच ती इंग्रजीशी टक्कर घेऊ शकेल. १३०० वर्षाची मराठीची समृद्ध परंपरा असलेले १० कोटी लोक जगातील १०० देशांमध्ये पसरलेले आहेत. दरवर्षी दोन हजार पुस्तके प्रकाशित होतात. छोटी-मोठी दोनशे साहित्य संमेलने होतात. सातवाहन, राष्ट्रकूट आणि मराठे असे मराठी राज्यकर्ते भारतभर राज्य करीत होते.

इंग्रजी भाषा अभिजात नाही, परंतु ती वर्तमानाची आणि भविष्याची भाषा आहे. भाषा प्रवाही राहून अधिकाधिक वापरली तर अधिक समृद्ध होते. मराठी भाषा रोजच्या व्यवहाराची ,शिक्षणाच्या माध्यमाची आणि जगण्याची भाषा बनेल तरच मराठीला प्रतिष्ठा मिळेल . हस्ताक्षर , निबंध आदी स्पर्धात यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानीत करणेत आले.

मराठी विभागप्रमुख प्रा वीणा कोकजे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला तर अध्यक्षीय समारोपात प्राचार्या माधुरी पाटील यांनी ” आज मराठी शाळांचे खच्चीकरण होते आहे याविषयी चिंता व्यक्त करून मराठी भाषा सशक्त होण्याची गरज प्रतिपादली.” यावेळी उपप्राचार्य वसुंधरा जाधव , कलाविभाग प्रमुख ऋतुजा भोवड आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौमित्र जोशी यांनी केले.