Breaking News

फडणवीस, अजित पवार दिल्लीला गेले, पण एकनाथ शिंदे मुंबईतच! मंत्रिमंडळ कसं ठरणार?

विधानसभेचा निकाल लागून २० दिवस उलटल्यानंतरही अद्याप राज्यात मंत्रिमंडळाची आकाराला आलेलं नाही. काही महत्त्वाची खाती व काही मंत्र्यांच्या नावावरून वाद असल्यानं हा खोळंबा सुरू आहे. त्यासाठी आज दिल्लीत बैठक होणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या बैठकीकडं पाठ फिरवल्यानं पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही होते, मात्र नाराज एकनाथ शिंदे यांनी न जाणं पसंत केलं. गेल्या काही दिवसांत झालेल्या बैठकीत फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपला २२, शिवसेनेला ११ आणि राष्ट्रवादीला १० जागा देण्यावर सहमती दर्शवली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ सदस्यसंख्या ४३ इतकी आहे.

भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अधिक मंत्रिपदासाठी आग्रह धरला तर त्यांना तुलनेनं नगण्य खात्यांवर समाधान मानावं लागेल. महत्त्वाच्या खात्यांचा विचार केला तर भाजपनं गृह खातं स्वत:कडं ठेवलं आहे, तर महसूल खातंही त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. गृह खात्यासाठी आग्रही असलेल्या शिंदे यांच्याकडं नगरविकास खातं देण्याचं ठरलं आहे, तर अर्थ खातं अजित पवारांकडं जाणार आहे.

फडणवीस आणि अजित पवार बुधवारी रात्री किंवा गुरुवारी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार होते. शिंदे हेही या बैठकीला उपस्थित राहणं अपेक्षित होतं, मात्र ते दिल्लीला गेलेच नाहीत. त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरविकास खातं वगळता त्यांना अन्य कोणतंही महत्त्वाचं खातं देण्यात आलेलं नाही. एमएसआरडीसीसह महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण आणि ऊर्जा या काही खात्यांसाठी ते उत्सुक होते, पण भाजपनं ही मागणी मान्य केली नाही. मागील सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना वगळण्याच्या भाजपच्या अटीवरही शिंदे नाराज आहेत.

‘प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना धडपड करावी लागत आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयात मोलाचं योगदान देऊनही त्यांना सत्तेत योग्य वाटा देण्यात आलेला नाही, अशी शिंदे यांची भावना आहे. त्यामुळं त्यांनी दिल्लीला न जाता ठाण्यातील आपल्या निवासस्थानी राहणं पसंत केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *